
Rahuri Election : नगर : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ जेऊर येथे पार पडलेली विजय संकल्प सभा उत्साह, निर्धार आणि प्रचंड जनसमर्थनाने गाजली. या सभेत जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
हेही वाचा : राहुरी विधानसभेत एक आमदार अवघ्या २३ मतांनी झाले होते विजयी; रंजक आठवणींना उजाळा
साकळाई पाणी योजनेचे काम एक महिन्यात सुरू (Rahuri Election)
सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत ‘आपकी बार ४०० पार’ या घोषणेचा काय परिणाम झाला हे सर्वांना ठाऊक आहे. ही निवडणूक केवळ एक राजकीय लढत नसून आपल्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी-पाथर्डी मतदारसंघात उभे केलेले विकासाचे भक्कम पायाभूत काम पुढे नेण्याचे कार्य आता अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून होणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोनचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार असून जिरायत भागातील साकळाई पाणी योजनेचे काम पुढील एक महिन्यात सुरू करण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
नक्की पहा : अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन
अक्षय कर्डिले यांना आमदार करणे ही काळाची गरज (Rahuri Election)
या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार प्रसाद लाड, महामंत्री विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे २४ तास जनतेत राहून काम करणारे नेतृत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अक्षय कर्डिले यांना आमदार करणे ही काळाची गरज आहे. त्यांनी संघर्षातून स्वतःचे स्थान निर्माण केले आणि जनतेचे प्रश्न सोडवले. त्यांच्या कार्याची खरी परतफेड म्हणजे अक्षय कर्डिले यांचा विजय असे ते म्हणाले.


