Rahuri Assembly: राहुरी विधानसभेत एक आमदार अवघ्या २३ मतांनी झाले होते विजयी; रंजक आठवणींना उजाळा 

शरद पवार यांची न झालेली सभा ठरली चर्चेचा विषय

0

अनिल देशपांडे 

Rahuri Assembly:राहुरी: 28 वर्षांपूर्वी राहुरी विधानसभा (Rahuri Assembly) पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर कदम यांच्या रूपाने या मतदारसंघात प्रथम भाजपाचे कमळ फुलले. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी या विधानसभेची पोटनिवडणूक (By-election) होत आहे. पुनर्रचित राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात भाजपने माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनाच मैदानात उतरवलेले आहे. 1998 मध्ये तत्कालीन खासदार प्रसाद तनपुरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाली होती. आताआमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने 1998 च्या पोटनिवडणुकीविषयीची चर्चा मतदारसंघात होत आहे. भाजपचे चंद्रशेखर कदम यांनी अवघ्या 23 मताच्या फरकाने या निवडणुकीत विजय मिळवला होता. दोन वेळा झालेली फेरमतमोजणी आणि मतमोजणी दरम्यान काही मिनिटांसाठी खंडित झालेला वीज पुरवठा यामुळे ही निवडणूक आजही चर्चेचा विषय ठरते आहे. 1998 मध्ये काँग्रेसचे आमदार प्रसाद तनपुरे यांना कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याने व त्यांनी तत्कालीन भाजपचे खासदार भीमराव बडदे यांचा पराभव करून ते खासदार झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यावेळी 1998 मध्ये राहुरी मतदार संघाची पोटनिवडणूक झाली.

अवश्य वाचा-  दुसऱ्या लग्नाच्या मोहात हातात पडली बेडी; पहिले लग्न लपवणाऱ्या अभियंत्याचा बनाव उघड

मतमोजणीत सुरुवातीपासूनच चूरस (Rahuri Assembly)

त्यावेळी एकत्रित पूर्ण राहुरी तालुका हा मतदार संघ होता. या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर कदम ,काँग्रेसचे रामदास पाटील धुमाळ, जनता दलाचे लक्ष्मण धागुडे व अपक्ष उमेदवार अँड. पंढरीनाथ पवार यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात होते. पोटनिवडणूक असल्याने 54.3 टक्के मतदान झाले. मतमोजणीत सुरुवातीपासूनच चूरस दिसून आली.अंतिम फेरीत कदम अवघ्या चार मतांनी पराभूत होण्याची शक्यता होती. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र, त्याआधी धुमाळ समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली होती. पहिल्या फेर मतमोजणी त्यांच्या मतात वीस मतांची वाढ होऊन ते सोळा मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर रामदास धुमाळ निवडणुकीतील मिरवणुकीतून मतमोजणी स्थळी आले. त्यांनीही फेरमत मोजणीची  मागणी केली. ही मागणी करताना तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार यांच्याशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली होती. दुसऱ्या फेर मतमोजणीत कदम यांना आणखी सात मिळाली. आणि अखेर ते 23 मतांनी विजय ठरवले. या प्रक्रिये दरम्यान काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याने मतमोजणी ठप्प झाली होती. मुळा प्रवरा वीज पुरवठा संस्थेचा वीजपुरवठा होता. खंडित वीजपुरवठ्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच सुमारे 4000 मते सुरुवातीला बाद ठरवण्यात आली होती.

नक्की वाचा- अक्षय तृतीयेला सोनं स्वस्त होणार की आणखी महागणार? आजचे दर किती?

शरद पवार यांची न झालेली सभा ठरली चर्चेचा विषय (Rahuri Assembly)

भाजप कार्यकर्त्यांच्या हरकतीनंतर काही मते पुन्हा मोजणीत घेतली गेली आणि त्याचा निकालावर परिणाम झाला. या निवडणुकीची आकडेवारी पाहता एकूण मतदार संख्या एक लाख 63 हजार 444 होती. त्यापैकी 88 हजार 829 मतदारांनी मतदान केले. चंद्रशेखर कदम यांना 34523 तर रामदास पाटील धुमाळ यांना 34500 मते मिळाली. अँड. पंढरीनाथ पवार यांना 150 59 अशी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या विजयामुळे साखर कारखानदारीच्या पट्ट्यातून निवडून येणारे भाजपचे पहिले आमदार म्हणून चंद्रशेखर कदम यांची नोंद झाली. त्यानंतर 1999 मध्ये प्रसाद तनपुरे यांनी कदम यांचा 600 मतांनी पराभव केला. तर 2004 मध्ये कदम यांनी तनपुरे यांच्यावर दहा हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला. या मतदारसंघात तनपुरे आणि कदम कुटुंबियांमधील राजकीय लढत दीर्घकाल रंगली होती. 2014 ,19 आणि 24 च्या निवडणुकीतही चूरस कायम राहिली. दरम्यान वयाच्या साठ वर्षानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय चंद्रशेखर कदम यांनी घेतल्याने पुढील निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत. राहुरीच्या राजकीय इतिहासातील 1998 ची पोटनिवडणुकीतील थरार हा अनपेक्षित होता. त्यावेळी रामदास पाटील धुमाळ यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची न झालेली देवळालीप्रवराची सभा ही एक चर्चेचा विषय ठरली. त्यावेळी धुमाळ यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा होणार होती. मात्र, ती सभा झाली नाही. त्या न झालेल्या सभेचा  या निकालावर परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आजही आहे.आता भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून भाजपने कर्डिले यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे गोविंद मोकाटे रिंगणात आहेत. तर वंचित तर्फे संतोष चोळके यांना उमेदवारी दिलेली आहे. अन्य चार अपक्ष ही निवडणूक रिंगणात आहेत.