Global honor: पाथर्डी: तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील सुपुत्र तथा मुखई (ता. शिरूर, पुणे) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम अर्जुन शिरसाट यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण शिक्षकाचा जागतिक सन्मान (Global honor) झाला आहे. फिलिपिन्स येथील एफबीएसटी-टीबीबी युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना ‘डॉक्टर ऑफ एज्युकेशन’ ही प्रतिष्ठित मानद पदवी प्रदान करण्यात आली.प्राचार्य शिरसाट यांनी मातृभाषेतील उपयोजित लेखन या विषयावर आधारित संशोधन प्रबंध दोन वर्षांच्या कालावधीत चार सेमिस्टरमध्ये पूर्ण केला. या प्रबंधाचे विद्यापीठात यशस्वी सादरीकरण केल्यानंतर त्यांच्या संशोधनातील नावीन्यपूर्णता व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन ही पदवी बहाल करण्यात आली.
अवश्य वाचा- संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; लवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
जगभरातील शिक्षण पद्धतींचा केला अभ्यास (Global honor)
यासोबतच त्यांना आंतरराष्ट्रीय ‘शांतता शिक्षण डिप्लोमा’ देऊनही गौरविण्यात आले.जगभरातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून तो अनुभव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस असल्याचे डॉ. तुकाराम शिरसाट यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या या यशामागे मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्राचार्य शिरसाट यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, सचिव सुरेश रामराव पलांडे, उपाध्यक्ष सुभाष पलांडे, सीईओ मंगेश मोरे, मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे, संतोष दौंडकर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे.ग्रामीण भागातील एका शिक्षकाने जागतिक स्तरावर मिळवलेले हे यश पाथर्डी तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत असून, सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



