Dengue risk: पाथर्डी: तालुक्यातील भालगाव येथील कासुळे वस्तीवर डेंग्यूचा धोका (Dengue risk) निर्माण झाल्याचे चित्र समोर आले असून येथे सहा डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचे रक्तनमुने पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून घरोघरी तपासणी मोहीम सुरू आहे. तसेच येथील पाणीसाठ्यांवर फवारणी करण्यात आली आहे. सुमारे सव्वा चारशे लोकसंख्या आणि ८० घरांची वस्ती असलेल्या कासुळे वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून आरोग्य विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
अवश्य वाचा–कत्तलीसाठी चाललेल्या गोवंशीय जनावरांची सुटका; ६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वस्ती परिसरात दूषित पाण्याचे साठे (Dengue risk)
आतापर्यंत एकूण १० जण तापाच्या आजाराने बाधित आढळले असून त्यापैकी सहा रुग्ण डेंग्यू संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व रुग्ण सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, आणखी काही सौम्य प्रकाराच्या तापाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना औषधोपचार करण्यात आले आहेत. वस्ती परिसरात दूषित पाण्याचे साठे आढळून आल्याने आरोग्य विभागाने ते तत्काळ हटवून संबंधित ठिकाणी औषध फवारणी केली आहे.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नारायण वायभासे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

तापाच्या रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू (Dengue risk)
सध्या आरोग्य विभागाचे १२ कर्मचारी असलेली तीन पथके कासुळे वस्तीमध्ये कार्यरत असून घरोघरी जाऊन तपासणी सुरू आहे.खरवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल लाड व डॉ. मयुरी परजणे हे पुढील १५ दिवस वस्तीमध्ये विशेष लक्ष ठेवून नागरिकांची तपासणी करणार आहेत. तापाच्या रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात येत आहेत.डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये, साठवलेल्या पाण्याच्या टाक्या व भांड्यांवर झाकण ठेवावे, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन डॉ. दराडे यांनी केले आहे. दूषित पाणी व उघडे पाणीसाठे यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



