Nilesh Lanke | महाराष्ट्राच्या मावळ्यांचे जिंजीकडे प्रस्थान; १ हजार १३३ स्वयंसेवकांचा समावेश

0

Nilesh Lanke | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील कायनेटिक चौक येथे बुधवारी (ता.२९) “शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम” अंतर्गत तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याकडे (Gingee Fort) रवाना होणाऱ्या स्वयंसेवकांच्या बसेसचे ध्वजप्रदर्शन आणि प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला. खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि शिवसेना नेते प्रा. शशिकांत गाडे यांच्या हस्ते नारळ फोडून भगवे झेंडे दाखवत बसेस रवाना करण्यात आल्या. तब्बल १ हजार १३३ मावळ्यांच्या उपस्थितीने परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत देशाच्या विविध भागांत गडकोट संवर्धनाचा संदेश पोहोचविणारी ही मोहीम एक ऐतिहासिक पाऊल मानली जात आहे.

हे वाचा – सोलर कंपनीच्या संचालकाला मागितली २ कोटीची खंडणी; अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गडकोट संवर्धनाचा उपक्रम (Nilesh Lanke)

महाराष्ट्राच्या सीमांबाहेर प्रथमच गडकोट संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येत असून तामिळनाडूतील जिंजी किल्ला येथे स्वच्छता, संवर्धन आणि जतनाची कामे करण्यात येणार आहेत. सुमारे १ हजार २०० किलोमीटरचा एकमार्गी आणि एकूण २ हजार ४०० किलोमीटरचा हा प्रवास “आपला मावळा” संघटनेची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दूरची मोहीम ठरत आहे. आवश्यक साहित्य व उपकरणांसह स्वयंसेवक पूर्ण तयारीनिशी रवाना झाले असून महाराष्ट्र दिन जिंजी किल्ल्यावर साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नक्की वाचा : उपमहापौर धनंजय जाधव चषक जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे ३ मे ला आयोजन

जिंजी किल्ल्याला छत्रपतींच्या कालखंडात विशेष स्थान (Nilesh Lanke)

इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिंजी किल्ल्याला छत्रपतींच्या कालखंडात विशेष स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य परंपरेशी जोडलेला हा किल्ला पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्षकाळात तात्पुरती राजधानी म्हणून ओळखला गेला. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळी संवर्धनाची मोहीम राबविणे प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचा क्षण ठरत आहे.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी गडकोट हे इतिहास व स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत, महाराष्ट्रातील १४ गडांवर यशस्वी मोहिमा राबवल्यानंतर आता राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन वारसा जपण्याचा संकल्प पूर्ण होत असल्याचे नमूद केले. जिंजी किल्ल्यावर सेवा करणे हे भाग्याचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा. शशिकांत गाडे यांनीही या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे सांगत, ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सांस्कृतिक जतन आणि इतिहासाची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारी असल्याचे अधोरेखित केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रस्थान सोहळ्यास सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, नगरसेवक योगीराज गाडे, अल्ताफ शेख, सचिन पठारे, समीर वडजे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे खा. नीलेश लंके यांनी स्वतः काही अंतर बस चालवून स्वयंसेवकांमध्ये उत्साह निर्माण केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here