नगर: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande)यांच्यावर हल्ला (Attack) झाल्याची घटना आज घडली आहे. किर्तनकार संग्राम बापू भंडारे (Kirtankar Sangram Bapu Bhandare)यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी लंवाडे यांना आळंदी परिसरात गाठलं. त्यांच्याशी असभ्य वर्तन करत त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या (Throwing ink on someone) रिकाम्या केल्या. यावेळी त्यांनी लंवाडे यांना धमकी देखील दिली आहे. शाईफेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र विकास लवांडे यांच्यावर ही शाई फेक का करण्यात आली ते जाणून घेऊ…
नक्की वाचा : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक;राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नेमकं काय घडलं? (Vikas Lawande)
हल्ला झाल्यानंतर विकास लवांडे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, “आज सकाळी माझं आळंदी येथे दशक्रियेच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर मी पुण्याच्या दिशेनं निघालो. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि १०-१५ गोरक्षक होते. त्यांच्या दोन तीन गाड्या होत्या. या सगळ्या गुंडांनी मला निर्जनस्थळी अडवलं. मला गाडीतून खाली उतरवून माझ्या अंगावर शाईच्या दोन-तीन बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली. त्यातील दोघांकडे बंदूका होत्या. ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते.
या हल्ल्यानंतर लोक जमत असताना हे सर्वजण तत्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले १०-१५ गुंड यांचा मी निषेध करतो. त्यांच्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. यासाठी मी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात मी आलो आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत माझा सत्याग्रह याठिकाणी सुरू राहणार आहे,” अशी भूमिका विकास लवांडे यांनी घेतली.
अवश्य वाचा: खुशखबर! लाडक्या बहिणींना एकाचवेळी ४५०० रुपये मिळणार ; ते कधी ?
नेमकं प्रकरण का घडलं? (Vikas Lawande)
काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद उफाळून आला होता. वारकरी संप्रदायात गेल्या काही वर्षांपासून कट्टर हिंदुत्ववादी आणि धारकरी घुसरल्यावरून आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेत. वारकरी चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पुरोगामी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्याविरोधात दीर्घ लेख लिहिला. त्यांनी ते ४० घुसखोर महंत, कीर्तनकार कोण यांची नावे समोर आणणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही नावंही समोर आली होती. तर राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी देखील वारकऱ्यांमध्ये मनुवादी घुसल्याचा, घुसखोर असल्याचा आरोप करत अशा २० कीर्तनकारांची/महंतांची यादी जाहीर केली होती. याच वादातून आता आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांनी आपल्या गुरुवर्यांविरोधात टीका केल्याचा संताप व्यक्त करत, आळंदीत त्यांच्यावर ही शाईफेक केलं असल्याचं सांगितलं जात आहे.आता या घटनेनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विकास लवांडे यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मात्र आता या हे शाईफेक प्रकरणाची राज्याच्या राजकारणात आणि वारकरी संप्रदायात मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं अजून काय काय समोर येणार हेच पाहणे महत्वाच ठरणार आहे.



