
Karjat Nagar Panchayat : कर्जत : नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) गटनेता बदलानंतर १३ नगरसेवकांनी कर्जतच्या विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले (Rohini Sachin Ghule) यांच्यावर देखील अविश्वास ठराव दाखल करत त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशिया यांनी या संबंधी बुधवार, (ता. १३) विशेष सभा कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित केली असून कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतीमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे जोरदार वाहू लागले.
नक्की वाचा : माणिकदौंडी घाटात ग्रॅनाईटच्या ट्रकचा अपघात; चालकासह क्लीनर गंभीर जखमी
१५ नगरसेवकांमध्ये धुसफूस वाढली
सव्वा चार वर्षात कर्जत नगरपंचायतीमध्ये एकाच गटात असणाऱ्या १५ नगरसेवकांमध्ये धुसफूस चांगलीच वाढली आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या १५ नगरसेवकांचा एक गट स्थापन करण्यात आला. सव्वा तीन वर्षांत पदाधिकारी निवडीच्या महत्वकांक्षेत याच १५ नगरसेवकांमध्ये असंतोष उफाळला आणि ११ नगरसेवकांनी वेगळी चूल मांडत भाजपाशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा अक्षय राऊत यांच्यावर अविश्वास दाखवत सत्तांतर घडवले. यात तत्कालीन काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांना भाजपाने संधी देत उर्वरीत काळासाठी सर्वसाधारण महिला दोन नगराध्यक्षा फॉर्म्युला ठरवत विराजमान केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उपगटनेत्याने चक्क गटनेताच पदावरून केला दूर (Karjat Nagar Panchayat)
नगराध्यक्षा निवडीनंतर रोहिणी घुले यांच्यासह बंडखोरी करणारे ११ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करीत भाजपामय झाले. दहाच महिन्यात पुन्हा पदाधिकारी बदलावरून याच ११ नगरसेवकांमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली. आणि त्याची प्रचिती उपगटनेत्याने चक्क गटनेताच बहुमताने पदावरून दूर करीत आपले नाव गटनेत्या पदावर कोरले. विशेष म्हणजे या गटनेता निवडीत विरोधी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक यांनी भाजपाच्या गटाला मदत केली. आणि उषा राऊत यांच्या पायउताराचा बदला घेतला.
१७ पैकी १३ नगरसेवकांचा अविश्वास ठराव दाखल
गटनेत्या बदलावरच कर्जत नगरपंचायतीचे राजकारण न थांबता त्यांनी तात्काळ दुसरा अध्याय सुरू करीत विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांच्यावर १५ पैकी गटातील ११ नगरसेवक आणि भाजपाचे २ नगरसेवक यांना सोबत घेत एकूण १७ पैकी १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल करत त्यांना कर्जत नगराध्यक्षा पदावरून दूर करण्याची मागणी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आपल्या प्राप्त अधिकारानुसार १० दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करणे बंधनकारक असल्याच्या कारणाने बुधवार, (ता. १३) सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्यावरील अविश्वास ठराव मागणी पत्रानुसार बोलावली असून या बैठकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची नियुक्ती केली असल्याचे आदेश पत्र जारी केले आहे.


