AMC : अहिल्यानगर शहराच्या पाणी आणि भुयारी गटार योजनांसाठी जागतिक बँकेकडून कर्जाचा प्रस्ताव

0
AMC : अहिल्यानगर शहराच्या पाणी आणि भुयारी गटार योजनांसाठी जागतिक बँकेकडून कर्जाचा प्रस्ताव
AMC : अहिल्यानगर शहराच्या पाणी आणि भुयारी गटार योजनांसाठी जागतिक बँकेकडून कर्जाचा प्रस्ताव

AMC : नगर : शहरासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन पाणीपुरवठा आणि भुयारी गटार टप्पा २ योजनेसाठी निधी उभारणीचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाच्या निर्देशानुसार या दोन्ही योजनांसाठी सुमारे ७५ टक्के स्वहिस्स्याची रक्कम कर्जाच्या स्वरूपात उभी करण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी सोमवारी अहिल्यानगर महानगरपालिकेत येऊन प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. दोन्हीपैकी एका योजनेला जागतिक बँकेच्या मार्फत अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

हेही वाचा : नगर तालुका पोलिसांचे अनोळखी महिलेची ओळख पटविण्यास मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

जागतिक बँकेकडून कर्ज

सोमवारी जागतिक बँकेचे प्रतिनिधी ऍनी श्रेष्ठ, मूर्ती जन्नलागड्डा आणि सृष्टी ठाकूर यांनी महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत प्रतिनिधींनी सध्या सुरू असलेल्या व नव्याने प्रस्तावित योजनांची प्रत्यक्ष माहिती घेतली. महानगरपालिकेला या दोन्ही मोठ्या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीपैकी ७५ टक्के रक्कम कर्जातून तर उर्वरित रक्कम राज्य शासनाच्या योजनांमधून उभी करायची आहे. यापैकी एका योजनेसाठी जागतिक बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नक्की पहा : लोखंडाला आकार देत घडविला आयएफएस अधिकारी

निधी उभारणीसाठी कर्जाचे प्रस्ताव (AMC)

आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, शासनाच्या योजनेतून प्रकल्प राबवायचा असल्यास महापालिकेला स्वहिस्सा भरावा लागतो. ४९५ कोटींच्या पाणी योजनेसाठी व ६०० कोटींच्या भुयारी गटार योजनेसाठी स्वहिस्सा उभारणे मनपाला स्वनिधीतून शक्य नाही. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या साहाय्याने ‘महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजना’ (MUWREP) राबविण्यास मंजुरी दिली आहे. ही योजना नगर विकास विभागामार्फत राबवली जाणार आहे. या योजनेतून ‘महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कंपनी’ (MUINFRA) द्वारे जागतिक बँकेच्या सहाय्याने निधी उभारणीसाठी महानगरपालिकेने हे कर्जाचे प्रस्ताव केले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी महानगरपालिकेत येऊन योजनांची माहिती घेतली आहे. किमान एका योजनेला कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला आहे.