Karjat : नगर : कर्जतच्या राजकीय आखाड्यात उफाळून आलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्याचा फैसला बुधवारी (दि.13) होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगड्या बंदोबस्ताचे नियोजन केले. मात्र मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे बुधवाची अविश्वास ठरावाची सभाच जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली. न्यायालयात 11 जूनला पुढील सुनावणी होत असून तोपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : राहुरीत निसर्ग उपचार केंद्रावर छापा; बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
परस्परांची न्यायालयात धाव
विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या विरोधात 7 मे रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. तत्पूर्वी गटनेता निवडीवरूनही आरोप प्रत्यारोप झाले. संतोष मेहेत्रे यांच्याऐवजी सतीश पाटील यांची गटनेता पदी निवड करण्यात आली. गटनेता बदलास मान्यता देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात संतोष मेहेत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनीही अविश्वास ठरावासाठी बुधवारी (दि.13) बोलविलेली सभा अनधिकृत असल्याचे सांगत त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली.
नक्की पहा : घर पाडायला लावणाऱ्या अघोरी बाबावर कारवाई
विशेष सभा रद्द (Karjat)
मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी (दि.12) त्यावर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने ‘सद्यस्थिती कायम ठेवावी’ असे अंतरिम आदेश दिल्याचा दावा नगराध्यक्षांच्या समर्थकांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी लेखी आदेशाद्वारे 13 मे रोजी बोलावण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आल्याचे कळविल्याचे पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी माध्यमांना सांगितले.



