Fake Doctor : नगर : बनावट पदव्यांच्या आधारे अधिकृत नोंदणी नसताना रुग्णसेवा देणाऱ्या राहुरीतील एका बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केली. राहुरी येथील ‘गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रा’वर प्रशासनाने छापा टाकून तन्वीर हारुन देशमुख याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण रुग्णालय राहुरीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश बाबासाहेब मिसाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून प्राप्त झालेल्या गोपनीय आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोग्य विभागाने देशमुख याच्या क्लिनिकची पाहणी केली असता, तिथे इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक औषधे आढळली होती. यावेळी त्याने सादर केलेली बीएएमएस (नॅचरोपॅथी) आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे पडताळणीसाठी संबंधित बोर्डांकडे पाठवण्यात आली होती.
हेही वाचा : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई
बेकायदेशीरपणे ‘डॉक्टर’ शब्दाचा वापर
तपासणीदरम्यान आयुष मंत्रालय (भारत सरकार) आणि आयुष संचालनालय (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून मिळालेल्या अहवालात, देशमुख याने सादर केलेली प्रमाणपत्रे देणारी ‘इंडियन मेडिकल बोर्ड – नॅचरोपॅथी सिस्टिम, कानपूर’ ही संस्था नोंदणीकृत नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच उत्तर प्रदेशच्या आयुर्वेदिक तथा युनानी तिब्बी चिकित्सा पद्धती बोर्डानेही तन्वीर देशमुख त्यांच्याकडे नोंदणीकृत नसल्याचे कळवले. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, देशमुख केवळ ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करण्यास पात्र असतानाही तो बेकायदेशीरपणे ‘डॉक्टर’ शब्दाचा वापर करून रुग्णांवर उपचार करत असल्याचे निष्पन्न झाले.
नक्की पहा : बारामतीत पुन्हा विमान कोसळलं, गाव तेच अन् वेळही तीच…
क्लिनिकवर छापा टाकून पंचनामा (Fake Doctor)
याप्रकरणी ११ मे रोजी दिवाणी न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. तसेच या संदर्भात बोगस वैद्यकीय शोध समितीचे सदस्य गणेश बोऱ्हाडे यांनी देखील आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर १२ मे रोजी सकाळी आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या पथकाने नगर-मनमाड हायवेवरील रोशन कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या क्लिनिकवर छापा टाकून पंचनामा केला. या कारवाईत कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना आणि बोगस पदव्यांचा वापर करून रुग्णांच्या हिताला बाधा पोहोचवल्याबद्दल तन्वीर देशमुखविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत विविध कलमा नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करत आहेत.



