
Lok Adalat : नगर : न्याय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून ‘न्याय आपल्या दारी’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने “समाधान समारोह” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. दि. २१, २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष लोकअदालतीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या तडजोडपात्र प्रकरणांचा परस्पर संमतीने निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
हेही वाचा : डॉक्टर नसतानाही गर्भलिंगनिदान चाचणी; वडगाव मावळ येथून एक पोर्टेबल मशीन जप्त
प्रलंबित प्रकरणे निकाली
जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची तडजोडपात्र प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अथवा जिल्ह्यातील कोणत्याही तालुका न्यायालयाशी संपर्क साधून विशेष लोकअदालतीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे तसेच सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले वांजोळी येथील सचिन पंढरीनाथ दळवी व इतर यांनी दाखल केलेले विरुद्ध कडूबाई भारतपुरी गोसावी यांच्यातील केस क्रमांक ५८७९/२०२३ हे प्रकरण तडजोडीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर यांच्याकडे पाठविण्यात आले होते.
नक्की पहा : आरटीओ कॅम्पला आमदार अमोल खताळ यांनी अचानक भेट
चर्चा करून समेट (Lok Adalat)
दोन्ही पक्षकारांना नोटीस दिल्यानंतर ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दोन्ही पक्षकारांशी सविस्तर चर्चा करून समेट घडवून आणला. दोन्ही बाजूंनी तडजोडीस तयारी दर्शवल्याने तब्बल १५ वर्षांपासून सुरू असलेला वाद सामोपचाराने मिटविण्यात यश आले. या प्रक्रियेत ॲड. आघाव यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे संबंधित पक्षकारांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, लोकअदालतीच्या माध्यमातून परस्पर सहमतीने वाद निकाली निघाल्याने दोन्ही पक्षकारांनी संतोष व्यक्त केला. याबाबत अधिक माहितीसाठी ८५९१९०३६१६ या मोबाईल क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


