
Pathardi Sub-District Hospital : पाथर्डी : उपजिल्हा रुग्णालयातील (Pathardi Sub-District Hospital) अधीक्षक डॉ. सचिन दरंदले (Dr. Sachin Darandale) यांची महाराष्ट्र बदली कायदा २००५ नुसार तत्काळ बदली करण्यात यावी, तसेच अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही बदली करावी, अशी मागणी पाथर्डीतील नागरिकांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर (Prakash Abitkar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : राष्ट्रीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत राहुरी फॅक्टरीच्या खेळाडूंची चमक
एकदाही ओपीडी सेवा दिली नसल्याचा आरोप
याबाबत किशोर हरेर व शाहनवाज शेख यांनी मंत्रालयात सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. सचिन दरंदले यांनी ९ ऑगस्ट २०२२ रोजी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारला होता. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी एकदाही ओपीडी सेवा दिली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही लाभ झाला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
रुग्णांना अपमानास्पद वागणूक (Pathardi Sub-District Hospital)
महाराष्ट्र बदली कायदा २००५ मधील कलम ३ व ४ नुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. मात्र, डॉ. दरंदले हे चार वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असून बदली नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी दहा ते पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून रुग्णांना अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार वाढल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहिल्याने कर्मचारी व प्रशासनामध्ये हितसंबंध निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांवर कोणताही प्रशासकीय धाक राहिलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सोनोग्राफी तपासणीतील अनियमितता या मुद्द्यांचा समावेश
दरम्यान, डॉ. सचिन दरंदले यांच्या कार्यकाळातील विविध तक्रारींची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणत्याही अधिकारी पदावर नियुक्त करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये १०८ रुग्णवाहिका सेवेतील अडचणी, डायलिसिस विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, तसेच सोनोग्राफी तपासणीतील अनियमितता या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती नाशिक विभागीय उपसंचालक, जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही देण्यात आल्या आहेत.


