No Vehicle Day : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेच्या (State and Central Government Employees’ Association) वतीने इंधन बचतीचा महासंकल्प हरित चळवळीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यात दर शुक्रवारी ‘नो व्हेईकल डे’ (No Vehicle Day) या संकल्पनेचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. इंधन बचतीच्या (Save Fuel) या आवाहनाला शासकीय कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पहिल्याच शुक्रवारी आढळून आले.
नक्की वाचा : पाथर्डीतील जुन्या पालिका इमारतीत चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास
प्रतिसाद देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे केले स्वागत
इंधन बचतीला प्रतिसाद देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेपूर्वी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष अशोक मासाळ, विलास पेदराम, वंदना नेटके, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज आदी उपस्थित होते. इंधन बचतीच्या संकल्पनेला प्रतिसाद देत पहिल्या शुक्रवारी स्वतः निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते हे सायकल चालवत ऑफिसमध्ये दाखल झाले. तर अहिल्यानगर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी देखील पायी चालत कार्यालय गाठले. तसेच भूसंपादन उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी देखील सार्वजनिक वाहतुकीसह काही अंतर पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद (No Vehicle Day)
जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश आघाव हे देखील सायकलवर स्वार होऊन कार्यालयात आले. अनेक कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनाला पसंती दिल्याचे आढळले. तर अनेक जण दुचाकी शेअर करीत कार्यालयात आले. राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देशात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हरित चळवळीचा महासंकल्प अहिल्यानगर जिल्ह्यात केला आहे.

प्रत्येक शुक्रवारी नो व्हेईकल डे चे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. तर प्लास्टिक मुक्ती तसेच वनसंवर्धनाची मोहीम देखील आखण्यात आली आहे. उपक्रम हाती घेतल्यानंतर 22 मे रोजी पहिलाच शुक्रवार होत. त्यास जिल्हाधिकारी कार्यालयासह अहिल्यानगर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. अहिल्यानगर प्रांताधिकारी कार्यालयात या कामी स्वतः उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी तसेच आरडीसी दादासाहेब गीते उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी घेतलेला पुढाकार कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरला. इंधन बचतीला प्रतिसाद देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संघटनेच्या वतीने राष्ट्रहिताचा विचार करून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.



