Agriculture : परवानगीशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई होणार; ‘पणन’चा इशारा

0
Agriculture : परवानगीशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई होणार; ‘पणन’चा इशारा
Agriculture : परवानगीशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई होणार; ‘पणन’चा इशारा

Agriculture : नगर : महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारांचे विनियमन करण्यात येत असून, परवानगीशिवाय सुरू असलेल्या व्यवहारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व व्यापारी, संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिनियमातील तरतुदींचे पालन करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पणन संचालक शरद जेरे यांनी केले आहे.

हेही वाचा : बनावट, भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री; कंपनी संचालकासह विक्रेत्यावर गुन्हा

परवानगी न घेता खरेदी-विक्री

राज्यातील विविध भागांमध्ये काही व्यापारी, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कोणतीही आवश्यक परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी पणन संचालनालयास प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी परिपत्रक जारी करून संबंधितांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्रातील अध्यादेश क्रमांक १५ दिनांक ०५ जुलै २०२६ तसेच त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारित तरतुदींचा उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्य अधिनियमातील कलम ५ मधील काही तरतुदींमध्ये बदल करण्यात आले असून, विशिष्ट परिस्थितीत बाजार समितीकडून विनियमन लागू राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तथापि, थेट पणन, खाजगी बाजार, शेतकरी ग्राहक बाजार तसेच ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म यांसारख्या व्यवहारांसाठी संबंधित परवाने घेणे आवश्यक राहणार असल्याचे पणन संचालनालयाने कळविले आहे.

नक्की पहा : पाथर्डीत केमिकलयुक्त फळ विक्रेत्यांवर प्रशासनाचा छापा

इथे करा तक्रार (Agriculture)

आवश्यक परवानगी अथवा लायसन्सशिवाय शेतमाल खरेदी-विक्री व्यवसाय केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे