
Service Cooperative Society : पाथर्डी : तालुक्यातील शिरसाटवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (Service Cooperative Society) ही ग्रामीण सहकार क्षेत्रातील आदर्श संस्था म्हणून पुढे येत असून, २६ मे २०२६ रोजी ही संस्था शतकपूर्तीचा मानाचा टप्पा गाठत आहे. तब्बल शंभर वर्षांचा इतिहास लाभलेल्या या संस्थेने केवळ आर्थिक व्यवहारच (Financial Transactions) नव्हे तर गावाच्या सामाजिक आणि कृषी विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, संस्थेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत केवळ एक पाच वर्षांचा कार्यकाळ वगळता तब्बल ९५ वर्षे बिनविरोध (Uncontested) निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे.
नक्की वाचा : विहिरीमधील मोटर व केबल चोरण्यासाठी आलेल्या चोराला रंगेहात पकडले; आंबी येथील घटना

शेती व्यवसायाला चालना
शिरसाटवाडी हे गाव पूर्णपणे शेतीप्रधान असून येथील बहुतांश नागरिक शेती, दुग्ध व्यवसाय व पशुपालनावर अवलंबून आहेत. परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने शेती व्यवसायाला चालना मिळाली असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सेवा सोसायटीने नेहमीच भक्कम आधार दिला आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेने सुमारे पाच कोटी रुपयांचे कर्जवाटप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.मार्च २०२२ अखेर संस्थेवर तब्बल ४६ लाख २० हजार रुपयांचा तोटा होता. मात्र २०२२ मध्ये नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर संस्थेच्या आर्थिक घडीला शिस्त लावण्यात आली. थकबाकी वसुली, आर्थिक नियोजन आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर अवघ्या चार वर्षांत संस्थेने तोट्यातून बाहेर येत मार्च २०२६ अखेर ८१ लाख रुपयांचा नफा मिळविला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शिरसाटवाडीच्या संस्थेची आदर्शवत कामगिरीकडे वाटचाल (Service Cooperative Society)
या नफ्यातील सुमारे ७५ लाख रुपये थकबाकी व त्यावरील व्याज येणे बाकी असून सुमारे८१ लाख रुपये बँकेचे देणे आहे. चालू नफा सहा लाख रुपये आहे.तालुक्यातील ८४ विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये शिरसाटवाडीची संस्था आदर्शवत कामगिरीकडे वाटचाल करीत असल्याचे मानले जात आहे. मार्च २०२६ अखेर संस्थेने ८६ टक्के कर्जवसुली पूर्ण केली असून, ही कामगिरी ग्रामीण सहकार क्षेत्रासाठी उल्लेखनीय मानली जात आहे. संस्थेचे सुमारे सव्वानऊशे सभासद असून कर्जदारसंख्या पाचशेच्या घरात आहे. थकबाकीदार सभासदांची संख्या सुमारे सत्तर इतकी आहे. संस्थेचे शेअर्स भांडवल ८३ लाख रुपये आहे.
अधिकारी-कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे
संस्थेच्या यशस्वी वाटचालीत चेअरमन जनार्दन शिरसाट, व्हाईस चेअरमन बाळासाहेब बाबू शिरसाट यांच्यासह संचालक बाळासाहेब शिरसाट, भानुदास शिरसाट,वामन कराड, शिवाजी शेकडे, शिवनाथ घोडके, विक्रम ससाने, लीलावती भताने, गयाबाई सानप, प्रदोष साळुंखे, ज्ञानेश्वर शिरसाट, स्व. राजेंद्र शिरसाट तसेच सचिव दादासाहेब कंठाळी, लिपिक म्हातारदेव काकडे, उद्धव काकडे, अलताफ सय्यद या पदाधिकारी सहकारातील अधिकारी-कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. याशिवाय स्व. आमदार शिवाजी कर्डिले, स्व. आमदार अरुण जगताप, आमदार मोनिका राजळे, माजी समाजकल्याण सभापती अर्जुन शिरसाट, प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, सहकारी बँकेचे माजी तालुका विकास अधिकारी विष्णू जाधव, निरीक्षक पंकज राजगुरू तसेच सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी संजय आव्हाड यांचेही संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.
पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय व आढावा घेण्यात येणार
माजी चेअरमन, संचालक यांचेही योगदान लाभत आहे.शतकपूर्ती निमित्त २६ मे रोजी संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय व आढावा घेण्यात येणार आहे. शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा, आर्थिक शिस्त आणि सभासदांचा विश्वास यांच्या बळावर शिरसाटवाडी सेवा सोसायटी ग्रामीण सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करत असल्याची भावना सभासदांतून व्यक्त होत आहे.


