Fake Call : दारूच्या नशेत 112 वर खोटे कॉल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

0
Fake Call : दारूच्या नशेत 112 वर खोटे कॉल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Fake Call : दारूच्या नशेत 112 वर खोटे कॉल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Call : अकोले : दारूच्या नशेत आपली पत्नी व मेव्हणे मारहाण करत असल्याची खोटी माहिती देत 112 आपत्कालीन सेवा क्रमांकावर वारंवार कॉल करून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या वाघापूर येथील एका तरुणाविरुद्ध अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहिदास गोरक्षनाथ बर्डे (वय 36, रा. वाघापूर) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची शिफारस करा, मुस्लिम समाजाची मागणी

वारंवार कॉल

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर अशोक मोरे यांना 15 मे, 2026 रोजी 112 नियंत्रण कक्षामार्फत रोहिदास बर्डे याचा कॉल प्राप्त झाला. यावेळी त्याने पत्नी व मेव्हणे मारहाण करून शिवीगाळ करत असल्याची तक्रार केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी संबंधिताशी संपर्क साधला असता तो मोठ्याने आरडाओरड करत सहा महिन्यांपूर्वी पत्नीविरोधात दिलेल्या तक्रारीबाबत विचारणा करू लागला. त्यानंतरही बर्डे याने वारंवार कॉल करून पोलीस यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

नक्की पहा : राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या देव मीना व कुलदीप कुमारला रिक्षातून जावे लागले घरी

वैद्यकीय तपासणी (Fake Call)

पोलीस उपनिरीक्षक घोडे, पोलीस कॉन्स्टेबल गोरे व मोरे हे शासकीय वाहनाने वाघापूर येथे गेले. तेव्हा मारुती मंदिरामागे उभा असलेला बर्डे पोलिसांना पाहताच आरडाओरड करू लागला आणि “मी फाशी घेईन” अशी धमकी देऊ लागला. स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करून त्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता बर्डे याने मद्य अथवा अमली पदार्थांचे सेवन केल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. चौकशीत त्याने केलेले सर्व कॉल खोटे असल्याचे तसेच दारूच्या नशेत पोलीस प्रशासनाला त्रास देण्याच्या उद्देशाने 112 वर वारंवार फोन केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.