AMC : नगर : भारत सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल जनगणना मोहिमेचे काम सध्या अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात वेगाने सुरू आहे. आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला अधिक गती मिळाली असून प्रशासन, पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी व प्रगणक यांच्या समन्वयातून जनगणनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : पुष्करणी बारवेवर आढळला प्राचीन शिलालेख; शिवदुर्गकडून श्रीगोंद्यातील ४५व्या शिलालेखाचे वाचन
पुढील कामाचा आराखडा
या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षक व प्रभाग अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या जनगणना कक्षात बैठक आयोजित करण्यात आली. जनगणना प्रक्रियेतील अचूकता, कामाचा वेग व डिजिटल प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कामात अधिक समन्वय व कार्यक्षमता राखण्याच्या सूचना देत त्यांनी २३ मे ते १४ जून या कालावधीतील पुढील कामाचा आराखडाही सादर केला.
नक्की पहा : सोने खरेदीच्या बहाण्याने दागिने केले लंपास; पाथर्डीतील घटना सीसीटीव्हीत कैद
प्रगणकांचा गौरव (AMC)
साहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी पूर्ण झालेली गणनाघरे, प्रणालीमध्ये अद्ययावत झालेली माहिती, एचएलओ ॲपमधील अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. क्षेत्रीय कामातील तांत्रिक बाबींवरही त्यांनी सूचना दिल्या. डिजिटल प्रणाली अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे जनगणना विभाग प्रमुख राकेश कोतकर यांनी नमूद केले. बैठकीत विविध पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच नागरिकांशी संवादातील समस्या मांडल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रगणकांच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला. शहरातील सर्व प्रभागांतील पर्यवेक्षक व प्रभाग अधिकारी बैठकीस उपस्थित होते.



