
Worker Attempts to Hang Himself : नगर : अनेक वर्षांपासून थकीत वेतनासाठी सरकारी कार्यालयांच्या उंबरठ्यावर चकरा मारणाऱ्या एका साखर कारखाना कामगाराने अखेर टोकाचे पाऊल उचलत थेट अधिकाऱ्यांच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
हेही वाचा : महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग
वारंवार पाठपुरावा
आखिल सुभान शेख असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. ते नगर तालुका साखर कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत होते. मात्र, कारखाना बंद पडल्यामुळे त्यांचे तब्बल 3 लाख 80 हजार रुपये वेतन आणि इतर देणी थकलेली आहेत. संबंधित कारखाना सध्या बंद अवस्थेत असून त्याचा कार्यभार साखर पणन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शेख हे आपल्या थकीत पैशांसाठी साखर पणन विभागाच्या कार्यालयात वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र, प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नक्की पहा : सोने खरेदीच्या बहाण्याने दागिने केले लंपास; पाथर्डीतील घटना सीसीटीव्हीत कैद
टोकाचे पाऊल (Worker Attempts to Hang Himself)
आर्थिक अडचणी, कुटुंबाची जबाबदारी आणि सततचे हेलपाटे यामुळे मानसिक तणाव वाढल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. शेख यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन टेबलावर चढत फाशी घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कर्मचारी आणि अधिकारी घाबरून बाहेर पळाल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तोफखाना पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मोठा अनर्थ टाळला.


