Vrudheshwar Sugar Factory : पाथर्डी : वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Vrudheshwar Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीत (Election) १९ संचालक पदांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या एक दिवस अगोदरपर्यंत २५ उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २ जून असून, सोमवारी (ता. १) सायंकाळपर्यंत एकूण २५ अर्ज प्राप्त झाल्याने कारखान्याच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा : कर्जत तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले; ११ घरांचे नुकसान
यांनी केले अर्ज सादर
कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा माजी आमदार आप्पासाहेब राजळे, व्हाईस चेअरमन रामकिसन काकडे यांच्यासह विद्यमान संचालक मंडळातील आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उद्धव वाघ, सुभाष ताठे, श्रीकांत मिसाळ, रावसाहेब सातपुते, अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, सुभाष बुधवंत, शरद अकोलकर, यशवंतराव गवळी, काशिनाथ बर्डे, सिंधुबाई जायभाये तसेच स्वीकृत संचालक नारायण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय संचालक मंडळात नव्याने प्रवेश करण्यासाठी प्रदीप पाटील, संदीप लोखंडे आणि बापूसाहेब पाटेकर यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार (Vrudheshwar Sugar Factory)
विशेष म्हणजे माजी आमदार आप्पासाहेब राजळे, राहुल राजळे, सुभाष ताठे,बापूसाहेब पाटेकर या चार उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. तर आमदार मोनिका राजळे वेगवेगळ्या मतदार संघातून तीन अर्ज दाखल केले आहे.१९ व्यक्तींनी २५ अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने या जागेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस अखेर आलेले अर्ज व त्यानंतर अंतिम छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
२६ जून रोजी मतदान प्रक्रिया
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी ३ जून रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जूनपर्यंत आहे. अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप १९ जून रोजी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास २६ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर २७ जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी असल्याने उमेदवारी अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



