Firing on the Police : पोलिसांवर गोळीबार करून आरोपी फरार

Firing on the Police : पोलिसांवर गोळीबार करून आरोपी फरार

0
Firing on the Police : पोलिसांवर गोळीबार करून आरोपी फरार
Firing on the Police : पोलिसांवर गोळीबार करून आरोपी फरार

खरवंडी-भगवानगड रस्त्यावरील घटना; पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

Firing on the Police : पाथर्डी : अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिस (Police) पथक गेले होते. या पथकावर आरोपीने अग्निशस्त्रातून गोळीबार (Firing on the Police) करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी-भगवानगड रस्त्यावर घडली. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) आरोपीसह त्याच्या दोन ते तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

शरण येण्यास नकार देत पोलिसांच्या दिशेने गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ३४२/२०२६ च्या तपासादरम्यान निष्पन्न झालेला आरोपी पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड (रा. खरवंडी, ता. पाथर्डी) याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे व त्यांचे सहकारी गुरुवारी (दि. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपीच्या घरासमोर गेले होते. यावेळी आरोपीने पोलिसांना तुम्ही कोण आहात व येथे काय करता, अशी विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी आपली ओळख सांगून तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, आरोपीने शरण येण्यास नकार देत त्याच्या ताब्यातील अग्निशस्त्रातून पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पोलिस पथकावरील हा हल्ला गंभीर मानला जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांवर गोळीबार झाल्यामुळे खळबळ (Firing on the Police)

गोळीबारानंतर आरोपी त्याच्या दोन ते तीन अनोळखी साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९, १३२, ३(५) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव काळूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव व विशाल लहाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने करीत आहेत. दरम्यान, पोलिसांवर गोळीबार केल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी व त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.