Illicit liquor : गावात अवैध दारू सापडल्यास पोलीस पाटील दोषी; अकोले प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय

0
Illicit liquor : गावात अवैध दारू सापडल्यास पोलीस पाटील दोषी; अकोले प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय
Illicit liquor : गावात अवैध दारू सापडल्यास पोलीस पाटील दोषी; अकोले प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय

Illicit liquor : नगर : अकोले तालुक्यात वाढत्या अवैध दारू व्यवसायावर आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, अवैध दारू माफियांविरोधात आरपारची लढाई छेडण्याचा निर्धार करण्यात आला. गावात अवैध दारू विक्री किंवा निर्मिती होत असल्यास आता पोलिस पाटलांनाही जबाबदार धरण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक व निलंबनाची कारवाई केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी बैठकीत घेतला. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर तहसील कार्यालयात महसूल, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत अवैध दारूविरोधात संयुक्त आणि कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’

दारूग्रस्त गावांचा आढावा

बैठकीदरम्यान उंडे यांनी दारूग्रस्त गावांचा आढावा घेत अधिकार्‍यांना थेट जाब विचारला. कारवाई नेमकी काय केली? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी परमिट रूममधूनच अवैध दारूचा पुरवठा होत असल्याचे गंभीर निरीक्षण नोंदवत संबंधित दुकानांचे परवाने रद्द करण्याची शिफारस करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नक्की पहा : सुपा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

संगमनेर परिसरातून पुरवठा (Illicit liquor)

तालुका दारूबंदी शासकीय समितीचे अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी यांनीही बैठकीत प्रशासनावर टीका करत अवैध दारू वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. संगमनेर परिसरातून दररोज अवैध दारूच्या गाड्या खुलेआम फिरतात, तरीही यंत्रणा निष्क्रिय आहे, असा आरोप त्यांनी केला. यावर उंडे आणि पोलिस अधिकार्‍यांनी पोलिस पाटलांना स्पष्ट इशारा दिला. पोलिस पाटील हे गावातील कायद्याचे महत्त्वाचे घटक आहेत. दारूविक्री थांबवण्यात दुर्लक्ष झाले तर संबंधितांवरही कारवाई केली जाईल, असे ठणकावून सांगण्यात आले. तसेच ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.