नगर : राज्यातील शेतकऱ्यांची सध्या (Latur Farmers News) भीषण अवस्था पाहायला मिळत आहे. कधी पावसामुळे तर कधी पाण्याअभावी पीक नीट येत नाही आणि पीक जरी आलं तरी त्याला भाव मिळत नाही. त्यातच फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केलीय. त्यातही त्या कर्जमाफीला अनेक अटी आणि शर्ती लागू केल्यात. पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न या बळीराजाला पडलाय.अशातच आता शेतकऱ्याचे भीषण वास्तव दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. लातूरमधील एका शेतकऱ्याला नांगराच्या औताला पत्नीला जुंपण्याची वेळ (A farmer yoked his wife to the plough) आली आहे. ही वेळ त्यांच्यावर नेमकी का आली ते जाणून घेऊ…
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची कुणाला?
लातूर जिल्ह्यातील देवणी येथील बोंबळी गावात घडली घटना (Latur Farmers News)
वीज कोसळून बैल दगावला आणि दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक ताकदही नव्हती, मात्र शेतीची कामे थांबू नयेत, म्हणून लातूरमधील एका शेतकऱ्याने पर्यायाअभावी नांगराच्या औताला आपल्या पत्नीला जुंपलं. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना लातूर जिल्ह्यातील देवणी येथील बोंबळी गावात घडलीय. स्वतःला औताला जुंपून औत ओढणाऱ्या या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. हौसाबाई काशीनाथ गायकवाड असे या महिलेचे नाव असून, देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत.
अवश्य वाचा : १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने बदलला ‘तो’ महत्वाचा नियम
किती आश्चर्य आहे पहा, एकीकडे आपण बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणतो, जर हे खरंच आपण मानत असू तर याच बळीराजाच्या चांगल्या बातम्या आपल्याला पाहायला मिळायला हव्यात. मात्र तस न होता रोज एक विदारक चित्र आपल्याला देशभरात पाहायला मिळत, कधी शेतकरी आत्महत्या असतील, कधी त्याच शेतकऱ्याचे अतिवृष्टीने झालेले नुकसान असेल, तर कधी त्याच शेतकऱ्याला पाण्याअभावी पीक घेता नसेल,आणि कधी त्याच शेतकऱ्याला शेतीमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याची वेळही येते.
लातूरच्या शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं? (Latur Farmers News)
काशिनाथ गायकवाड यांच्या शेतात काही दिवसांपूर्वी त्यांचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. खरीप हंगामातील पेरणीची वेळ सुरू असताना दुसरा बैल खरेदी करण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. अखेर या शेतकरी कुटुंबाने स्वतःच शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. या वेळी काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचे काम केले.
वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू आहे. काशिनाथ गायकवाड हे स्वतः भूमिहीन आहेत. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही. गावातील इतर शेतकऱ्यांची जमीन कसून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना दोन मुले आणि चार मुली,असा परिवार आहे. बोंबळी हे गाव वलांडी परिसरालगत असून येथील बहुतांश नागरिक शेती आणि मजुरीवरच अवलंबून आहेत. अचानक उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे गायकवाड कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव अधोरेखित करणारे हे दृश्य सध्या परिसरातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
या प्रकरणावर आता लातूरचे जिल्हाधिकारी म्हणालेत की, ‘काशीनाथ गायकवाड यांचा वीज पडून मृत पावलेल्या बैलाचा पंचनामा झाला आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर ३२ हजार रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. काशीनाथ गायकवाड यांच्या नावावर शेती नसून, ते इतरांच्या शेतात मजुरी करतात’, असं जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्याची विदारक स्थिती दाखवणारा लातूरमधील हा हृदयद्रावक व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या कुटुंबाला त्वरीत मदत मिळवून देण्याची आणि शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी आमदार पवारांनी या पोस्टमधून केली आहे.
आता मदतीची मागणीही झाली, एका शेतकऱ्याला मदत मिळेल ही मात्र पुन्हा ही परिस्थिती राज्यात दिसणार नाहीका, असाही प्रश्न पडतो. एकीकडे हे सरकार शेतकऱ्यांचे हिताचे आहे असं सत्ताधारी म्हणतात तर दुसरीकडे याच शेतकऱ्याची गावोगावी खरी अवस्था काय आहे? याचा कधी विचार होईल का? असाही प्रश्न विचारला जातोय, की शेतकऱ्याला फक्त अवहेलनाच सहन करावे लागेल, याच उत्तर मात्र अनुत्तरित आहे.



