Educational Certificates : नगर : दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना लुटणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना शिक्षण विभागाने जोरदार दणका दिला आहे. शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आणि गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देताना कोणतीही रक्कम आकारू नये, असे स्पष्ट करीत माध्यमिक शिक्षण विभागाने बेकायदेशीर वसुली करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : गरिबीची झळ! वीज पडून बैल दगावला, बळीराजाने पत्नीलाच जुंपलं औताला
विद्यार्थ्यांची अडवणूक नको
शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक प्रवेशासाठी टीसी आणि मार्कलिस्ट आवश्यक असते. याचा गैरफायदा घेत काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची अडवणूक सुरू केली होती. जिल्ह्यातील काही नामांकित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रति विद्यार्थी तब्बल २०० रुपये उकळले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी थेट ई-मेल आणि लेखी स्वरूपात शिक्षण विभागाकडे केल्या होत्या.
नक्की पहा : पोलिसांवर गोळीबार करून पसार झालेले तिघे जेरबंद
आर्थिक दंडासह थेट प्रशासकीय कारवाई (Educational Certificates)
कोणत्याही शाळेने अशा प्रकारे अतिरिक्त पैशांची मागणी केली, तर त्याची तक्रार तात्काळ स्थानिक शिक्षण अधिकारी किंवा थेट शिक्षण संचालनालयाकडे लेखी अथवा ई-मेलद्वारे करावी, असे आवाहन वाहूळ यांनी केले आहे. ही महत्त्वाची प्रमाणपत्रे मोफत देणे बंधनकारक आहे. तरीही नियमांची पायमल्ली करणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम तात्काळ परत करावी, अन्यथा आर्थिक दंडासह थेट प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा माध्यमिक शिक्षण विभागाने दिला आहे.



