Fraud : राहाता : विवाह संस्थेच्या पवित्रतेलाच काळीमा फासणारा आणि समाजातील विश्वासाला तडा देणारा धक्कादायक प्रकार राहाता शहरामध्ये उघडकीस आला आहे. लग्न जमवून देण्याच्या आमिषाने एका तरुणाकडून तब्बल २ लाखांची रोख रक्कम, सुमारे १.२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ५ भार वजनाचे चांदीचे दागिने लंपास (Fraud) करण्यात आल्याचे फिर्यादीने सांगितले असून विवाह लावून दिल्यानंतर नवरीच पसार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी (Rahata Police) तांत्रिक तपासाच्या आधारे दोन महिला आरोपींना अटक (Accused Arrested) केली असून उर्वरित तीन संशयित महिला आरोपींचा शोध सुरू आहे.
नक्की वाचा : पोलिसांवर गोळीबार करून पसार झालेले तीन जण जेरबंद; दोन आरोपी अद्याप पसार
यांची नावे आली समोर
याबाबत राहाता पोलीस ठाण्यात १६ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून विवाहाचे आमिष दाखवत त्यांची आर्थिक फसवणूक केली. पोलीस तपासात आरोपी म्हणून संगीता संजय मोरे (रा. देर्डे कोऱ्हाळे, ता. कोपरगाव), सुमन माणिक साळवे (रा. वाळुंज, जि. संभाजीनगर), चंदा (पुर्ण नाव नाही), नाजुका सोमनाथ सावे, रुपाली बाळू दिशागज आणि पिंकी महादेव नाईकवाडे (रा. आंबेडकरनगर, हर्सूल रोड, संभाजीनगर) यांची नावे समोर आली आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश (Fraud)
फिर्यादीला विवाहासाठी मुलगी दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर लग्नाचा खर्च, मुलीच्या नातेवाईकांची व्यवस्था, पाहणी कार्यक्रम आणि इतर कारणे सांगून टप्प्याटप्प्याने दोन लाख रुपये रोख रक्कम उकळण्यात आली. विवाह पण लावून देण्यात आला. मात्र काही दिवसांतच नवरी पिंकी नाईकवाडे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली आणि फसवणुकीचा संपूर्ण डाव उघडकीस आला.गुन्हा दाखल होताच आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र राहाता पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल क्रमांकांवर तांत्रिक पाळत ठेवून लोकेशन ट्रॅकिंग सुरू ठेवली. काही दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आणि संगीता संजय मोरे व सुमन माणिक साळवे यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुका झाल्या
या प्रकरणात नाजुका सोमनाथ सावे, रुपाली बाळू दिशागज आणि पिंकी महादेव नाईकवाडे या आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्याविरुद्धही पोलिसांचे विशेष पथक विविध ठिकाणी तपास करत आहे. या टोळीचे इतर कोणाशी संबंध आहेत का, तसेच यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुका झाल्या आहेत का याचाही तपास सुरू आहे.पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी, पोलीस नाईक पी. एन. गडाख, होमगार्ड कांबळे आणि होमगार्ड वाघमारे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या समाजासाठी गंभीर धोका
पूर्वी दरोडेखोर रस्त्यावर लुटत होते; आता विश्वासाच्या नात्यांवर दरोडे पडत असल्याचे चित्र समाजात दिसू लागले आहे. विवाहासारख्या पवित्र संस्थेचा आधार घेत युवकांच्या भावनांशी खेळून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या समाजासाठी गंभीर धोका ठरत आहेत. आयुष्याचा जोडीदार शोधणाऱ्या कुटुंबांच्या आशा-अपेक्षांचा गैरफायदा घेतला जात असल्याने अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई होणे काळाची गरज बनली आहे. राहाता पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ दोन आरोपींना अटक करण्यापुरती मर्यादित नसून, विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या उद्योगाला दिलेला कडक इशारा आहे. फरार आरोपी अटकेत आल्यानंतर या रॅकेटमधील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



