नगर : महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या सागर मोहळकर हत्याकांड (Sagar Moholkar Murder Case) प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात (Jamkhed Crime) ज्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या, त्याच पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केलाय! आता नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊ…
नेमकं प्रकरण काय? (Jamkhed Crime)
पहिलवान सागर मोहळकर हत्याकांडातील आरोपीचे दोषारोपपत्र म्हणजेच चार्जशीट हे ९० दिवसांत जामखेड न्यायालयात सादर करण्यात पोलिसांकडून दिरंगाई झाली. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जामखेडच्या कनिष्ठ न्यायालयाने ९१ व्या दिवशी जामीन मंजूर केला. सागर मोहळकर हत्याकांड प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात ५ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अभिमन्यू महादेव पोते याला ९ मार्चला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची कुणाला?
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई (Jamkhed Crime)
कायद्यानुसार अशा गंभीर गुन्ह्यात आरोपीच्या अटकेनंतर ९० दिवसांत तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात चार्जशीट दाखल करणे बंधनकारक असते. मात्र या प्रकरणी तास काही झालं नाही. आरोपीच्या अटकेला ७ जून २०२६ ला ९० दिवसही पूर्ण झाले. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मुदतीत म्हणजेच (८ जून) पर्यंत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे होते, परंतु ते दाखल झाले नाही. पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेली हीच तांत्रिक दिरंगाई आरोपीचे वकील अॅड. हर्षल डोके यांनी अचूक हेरली. त्यांनी तातडीने जामखेड न्यायालयाच्या न्यायाधीश यू. ए.भोसले यांच्यासमोर ही चूक मांडत आरोपीला ‘वैधानिक जामीन’ मिळण्यासाठी अर्ज दाखल केला.
अवश्य वाचा : गरिबीची झळ! वीज पडून बैल दगावला, बळीराजाने पत्नीलाच जुंपलं औताला
या अर्जावर न्यायालयाने कोर्टाचे नाझर यांचे म्हणणे मागवले असता, त्यांनी ही न्यायालयात अद्याप कोणतीही चार्जशीट उपलब्ध झाले नसल्याचे स्पष्ट केले. सरकारी पक्ष व आरोपीच्या वतीने अॅड. हर्षल डोके यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला. अॅड. डोके यांचा कायदेशीर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश यू ए. भोसले यांनी आरोपी अभिमन्यू पोते याला अटी व शर्तीसह जामीन मंजूर करीत असल्याचे आदेश दिले. तसेच तपासी अधिकारी दशरथ चौधरी यांना चार्जशीट दाखल करायला उशिरा का झाला, याबद्दल कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली आहे.
आता एकीकडे सागर मोहळकर यांच्या कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या अशा दिरंगाईमुळे आरोपी सहज बाहेर येत आहेत. वेळेत चार्जशीट दाखल न होणं ही पोलिसांची चूक आहे की यामागे काही वेगळंच कारण आहे? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे.



