Stray dogs’ : पारनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पारनेर बसस्थानक (Bus Stand) हे तालुक्यातील प्रवासाचे मुख्य केंद्र आहे. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या बसस्थानकावर सध्या मोकाट कुत्र्यांच्या (Stray dogs’) वाढत्या उपद्रवामुळे प्रवाशांमध्ये (Passengers) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
नक्की वाचा : गोरक्षक नितीन महाराज शिंदे यांच्यावर हल्ला; परिसरात खळबळ
महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय
पारनेर बसस्थानक हे ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे सात ते आठ कुत्र्यांचे टोळके सतत ठाण मांडून बसलेले असते. बसस्थानकाचे प्रवेशद्वार, फलाट आणि बस आगमनाचे ठिकाण या कुत्र्यांचे मुख्य अड्डे बनले आहेत. फलाटांवर मुक्तपणे वावरणाऱ्या या कुत्र्यांच्या टोळक्यामुळे प्रवाशांची, विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर हे कुत्रे अचानक धावून जात असल्याने पळापळ होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसस्थानकावरील या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभीर्य तेव्हा स्पष्ट झाले जेव्हा स्मार्ट कार्ड काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ महिलांच्या गर्दीत हे कुत्रे घुसले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एक वृद्ध महिला फरशीवर पडून जखमी (Stray dogs’)
यावेळी घाबरून धावपळ उडाली असता एक वृद्ध महिला फरशीवर पडून जखमी झाली. या घटनेने प्रवासी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.बसस्थानक परिसरात पडलेले अन्नाचे अवशेष आणि अस्वच्छता यांमुळे कुत्र्यांचा वावर वाढला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी परिवहन आणि स्थानिक नगरपंचायत प्रशासनाची आहे. मात्र, अद्याप तरी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करून त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे. बसस्थानकावरील सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आता नागरिक आक्रमक झाले असून, लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.



