Madhi-Mayamba : पाथर्डी : शनिवार-रविवारच्या सुट्ट्या, अधिक मासातील अमावस्या आणि सोमवारी आलेली सोमवती अमावस्या (Somvati Amavasya) अशा दुर्मीळ संगमामुळे तालुक्यातील मढी, मायंबा, (Madhi-Mayamba) वृद्धेश्वर आणि मोहटा या प्रमुख देवस्थानांवर लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तीन दिवस सुरू असलेल्या या धार्मिक पर्वणीमुळे परिसराला मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
नक्की वाचा : ग्राहकांच्या तक्रारींमध्ये स्मार्ट मीटरमुळे मोठी घट – महावितरण
समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा
मढी येथील श्री कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे, मायंबा येथील श्री मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे, वृद्धेश्वर येथील आदिनाथांच्या पिंडीचे तसेच मोहटा येथील मोहटादेवीच्या दर्शनासाठी भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला होता. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नाथभक्तांनी या पवित्र स्थळांवर दर्शनाचा लाभ घेतला. विशेषतः मढी,मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मायंबा येथे सध्या मुख्य मंदिराचे बांधकाम सुरू असून भाविकांच्या देणगीतून कोट्यवधी रुपये खर्चून हे काम उभारले जात आहे. मंदिर उभारणीसाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मिळेल त्या जागी भाविकांनी ठोकला मुक्काम (Madhi-Mayamba)
खाजगी प्रवासी वाहने, देवस्थान समितीच्या बसेस, चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी वाहनांद्वारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते. रविवारी (ता. १४) सकाळपासून सुरू झालेली अमावस्या सोमवारी (ता. १५) सकाळपर्यंत असल्याने अनेक भाविकांनी दोन्ही दिवस पर्वणी मानून दर्शन घेतले. रविवारी रात्री मढी व मायंबा परिसरात मिळेल त्या जागी भाविकांनी मुक्काम ठोकला होता.भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे परिसरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व विविध सेवा पुरविणाऱ्यांचा मोठा व्यवसाय झाला. कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मढी-मायंबा, मढी-घाटशिरस-वृद्धेश्वर, मढी-तिसगाव, मढी-निवडुंगे आणि मढी-पाथर्डी या सर्व मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली.
भाविकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी
चैतन्य कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ महाराज की जय तसेच मोहटादेवी माता की जय या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. धार्मिक वातावरणात भक्तांनी मोठ्या उत्साहाने दर्शन घेतले.मात्र, भाविकांच्या वाढत्या गर्दीत काही समस्याही प्रकर्षाने समोर आल्या. मढीत नाडे बांधण्याच्या व्यवसायाच्या नावाखाली काही ठिकाणी भाविकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. या नाडा विक्रेत्याच्या व्यवसायामुळे गर्दीच्या ठिकाणी भाविकांची अनावश्यक गर्दी वाढल्याने चोरी, पाकिटमारी आणि लुटमारीच्या घटनाही घडत असल्याचे भाविकांनी सांगितले. मढीत काही दुकानदारांकडून वस्तूंची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या.
अतिक्रमणांमुळे भाविकांना मोठा त्रास
रात्री अशाच एका प्रकारातून भाविक व व्यावसायिकांमध्ये वाद झाल्याची घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंग रोड परिसरासह विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले. अतिक्रमणे हटवून रस्त्यांची रुंदी वाढवावी आणि भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नाथ भक्तांनी केली आहे.दरम्यान, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांसाठी सुलभ दर्शनबारी, पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, अन्नदान व स्वच्छता यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.



