Rahata Municipal Council : राहाता नगरपरिषदेच्या वतीने ‘मॅरेथॉन 2026’चे आयोजन; स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिमुकल्यांचा मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने सहभाग

0
Rahata Municipal Council : राहाता नगरपरिषदेच्या वतीने 'मॅरेथॉन 2026'चे आयोजन; स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Rahata Municipal Council : राहाता नगरपरिषदेच्या वतीने 'मॅरेथॉन 2026'चे आयोजन; स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Rahata Municipal Council : राहाता : जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त राहाता नगरपरिषदेच्या (Rahata Municipal Council) वतीने सोमवारी (ता. १५) नामदार मॅरेथॉन २०२६” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अगदी बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सुमारे दोन हजार स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेत (Marathon Competition) सहभागी झाले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत सर्व थरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नक्की वाचा : अधिक मास, सोमवती अमावस्या व सुट्ट्यांचे औचित्य; मढी-मायंबा येथे नाथ भक्तांचा महापूर

चिमुकल्यांचा मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने सहभाग

या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे नगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील स्पर्धकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. तरुण-तरुणींसोबतच लहान चिमुकल्यांनीही मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने सहभाग घेतल्याने धापटुंना पहाण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावर राहातेकरांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती सर्व सहभागी स्पर्धकांना वयोगटाप्रमाणे आकर्षक टी शर्ट आदल्या दिवशीच देण्यात आले होते. यावेळी अहिल्यानगर येथील फिट इंडिया च्या ॲम्बेसिडर स्वप्नाली जांबे व त्यांच्या कलाकार टीमने उपस्थितांच्या विविध गीतांवर नृत्य करत उपस्थितांचे मनोरंजन केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गेल्या महिनाभरापासून चालू होत या स्पर्धेचं नियोजन (Rahata Municipal Council)

यावेळी गायत्री मस्के व मोकळ सरांनी मनोरंजक सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला शोभा आणली तर नगराध्यक्षांसह सर्व उपस्थित नगरसेवक व त्यांच्या पत्नींनी डान्स मध्ये सहभागी होऊन आनंद घेतला. गेल्या महिनाभरापासून या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं होतं. राहाता नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉ विजय सदाफळ, नगरसेवक गटनेते मुन्ना शाह तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, नायब तहसीलदार हेमंत पाटील , मुख्याधिकारी वैभव लोंढे, नगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांनी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.पहाटे सहा वाजता मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

तीन गट करण्यात आले

स्पर्धेचे दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर असे तीन गट करण्यात आले होते. दहा किलोमीटर गटात कमलाकर देशमुख यांनी प्रथम क्रमांक पटकावला, रोहित बिन्नर यांनी द्वितीय, तर विशाल बनसोडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. पाच किलोमीटर गटात वैभव शिंदे प्रथम, अनिल जाधव द्वितीय, तर ईश्वर झिरवळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे या दोन्ही गटातील सर्व विजेते नाशिक जिल्ह्यातील आहेत. तीन किलोमीटर मुलांच्या गटात कृष्णा बो-हाडे (नाशिक) प्रथम, राजवीर केता (छत्रपती संभाजीनगर) द्वितीय, तर साईराज मुरादे (खडकेवाके) तृतीय ठरला.

धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिके वितरण

तर तीन किलोमीटर मुलींच्या गटात साक्षी कसबे (नाशिक) प्रथम, अंजली पंडीत (नाशिक) द्वितीय, आणि खुशी हसे (संगमनेर) हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना रणरागिनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. एकूणच, या मॅरेथॉन स्पर्धेमुळे राहाता शहरात उत्साही आणि क्रीडामय वातावरणात ना राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रथमच साजरा करण्यात आला. भल्या पहाटेच्या या आनंद सोहळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनीही छान बंदोबस्त ठेवला होता.