नगर : पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Crime) आगसखांड येथे दागिने व भांडी स्वच्छ करून देण्याचे आमिष दाखवत दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेची सुमारे ५८ हजार रुपये किमतीच्या १८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक (A woman was defrauded of her jewelry) केल्याची घटना सोमवारी (दि. १५) सकाळी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका लवकरच सुरु होणार; अमोल कोल्हेंकडून मोठी घोषणा
नेमकं काय घडलं? (Pathardi Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजया सिताराम कदम (वय ४६, रा. आगसखांड) या सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभ्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. ते हिंदीत बोलत म्हणाले की, हम लोग कंपनी की तरफ से बर्तन और जेवर साफ करने वाले पाउडर का प्रचार करने आए हैं। आपके पास कोई बर्तन या गहने हों तो दीजिए, हम उन्हें चमकाकर देंगे. पैसे भी अभी नहीं, २० तारीख को दे देना. त्या महिलेने या अनोळखी व्यक्तींना नकार देत, “घर में कोई नहीं है, मुझे आपकी भाषा समझ में नहीं आती, आप बाद में आइए,” असे सांगितले.

मात्र त्यांनी पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या पावडरच्या पिशव्या दाखवत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आले. थोड्या वेळासाठी फिर्यादींना काय घडले हे समजले नाही. त्यानंतर त्यांची सून निकिता घराबाहेर आल्यानंतर दागिने कुठे आहेत, अशी विचारणा तिने केली. त्यावेळी महिलेने गळ्यातील व कानातील दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे दिसून आले.
अवश्य वाचा : आता महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी दर्जा’; फडणवीस सरकार आणणार नवं विधेयक
पाथर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल (Pathardi Crime)
या घटनेत २५ हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी-मंगळसूत्र, १८ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेल आणि १५ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर असे एकूण ५८ हजार रुपयांचे दागिने अज्ञात भामट्यांनी फसवणुकीच्या उद्देशाने लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.
अशा घटना जिल्ह्यात घडत असतील तर आपणही सतर्क राहणे गरजेचं आहे. ‘दागिने किंवा भांडी चमकवून देतो’ असे सांगत कोणीही दारात आलं तर त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पाथर्डी पोलीस आता या भामट्यांचा शोध घेत आहेत, पण आपली सावधगिरी हाच यावरचा खरा उपाय आहे. तुमच्या गावात किंवा आजूबाजूला असे संशयित लोक फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा.



