Bhausaheb Wakchaure : नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) सुमारे 17 वर्षांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा पराभव झाला होता. त्याचे शल्य आठवले यांना अद्याप आहे. अजूनही त्यांची या मतदारसंघातून निवडून येण्याची सुप्त इच्छा कायम आहे. त्यांचा हा गाजलेला पराभव त्यावेळी शिवसेनेत असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी केला होता. त्यानंतर विविध कारणांमुळे सतत चर्चेत राहिलेले वाकचौरे यांनी आता उध्दव ठाकरेंची साथ सोडली आहे. लवकरच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जातील. आता त्यांच्या या प्रवेशाचा फटका माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना बसणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोखंडे सुरवातीपासूनच शिंदे यांच्या गटात असून त्यांचा शिर्डी मतदारसंघावरील दावा कायम आहे. 2029 च्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
नक्की वाचा : विरोधात उरले फक्त एक खासदार दोन आमदार, अहिल्यानगर जिल्हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूला
शिर्डीत शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना
खासदार वाकचौरे यांनी ठाकरे यांची साथ सोडल्याने शिर्डीत शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संतप्त भावना आहे. मुख्य म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांना उमेदवारी देण्यास अनेक शिवसैनिकांचा विरोध होता. जिल्ह्यातील अनेक निष्ठावान आणि बबनराव घोलप यांच्यासारख्या नेत्यांना डावलून त्यावेळी वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी निर्माण झालेल्या भाजपविरोधी लाटेत वाकचौरे निवडून आले होते. आता वाकचौरे यांनी ठाकरेंची साथ सोडल्याचे पडसाद शिर्डीत उमटू शकतात. तर दुसरीकडे त्यांची जागा घेण्यासाठी ठाकरे गटातील जुने नेते पुन्हा सक्रीय होताना दिसतील.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आठलेंचा पराभव केल्याने वाकचौरे संपूर्ण राज्यात चर्चेत (Bhausaheb Wakchaure)
आपला माणूस आपल्यासाठी, अशी ओळख असलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका गरीब कुटुंबातून ते आहेत. त्यांनी बी.कॉम आणि एलएलबी केल्यानंतर शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सरकारी सेवेत विविध पदांवर अधिकारी म्हणून काम करत ते सेवानिवृत्त झाले. शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखऩीय ठरली. निवृत्तीनंतर ते राजकारणात आले. २००९ मध्ये पहिल्यांदा शिर्डी या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांनी आठलेंचा पराभव केला. यासाठी त्यांना विखे पाटलांची आतून मदत झाल्याचे सांगण्यात येत होते.
आठलेंचा पराभव केल्याने वाकचौरे संपूर्ण राज्यात चर्चेत आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने पुन्हा त्यांना संधी दिली होती. मात्र ऐनवेळी वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा पराभव झाला. तेथून सदाशिल लोखंडे यांची कारकीर्द सुरू झाली. आता वाकचौरे यांची पुढील वाटचाल पुन्हा लोखंडे यांच्या राजकीय प्रवासाला अडसर ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.



