Protest : सीना नदीतील अतिक्रमण हटवा; नेप्ती ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

0
Protest : सीना नदीतील अतिक्रमण हटवा; नेप्ती ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
Protest : सीना नदीतील अतिक्रमण हटवा; नेप्ती ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन

Protest : नगर : नेप्ती येथील चांदपीर वस्ती जामगाव नाला-सीना नदीपात्रात करण्यात आलेले कथित अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे. नदीपात्रात टाकलेली भर व अनधिकृत पुल (बंधारा) काढण्यात यावा, या मागणीसाठी नेप्ती ग्रामस्थांनी आज (ता. १८ जून) सकाळी ९ वाजता छत्रपती कॉलेज परिसरात रस्ता रोको आंदोलन केले.

नक्की पहा : श्रीगोंद्यात थरार! ‘लिव्ह इन’मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला

दखल न घेतल्यामुळे आंदोलन

नुकतेच ग्रामस्थांनी तहसील कार्यालयाला निवेदन देत चांदपीर वस्ती परिसरातील सीना नदीवरील काही व्यक्तींनी नदीपात्रात अतिक्रमण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यानंतर शेजारील शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. याची दखल न घेतल्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संदर्भात मंडळ अधिकारी, नेप्ती यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा सादर केला. पंचनाम्यानुसार जामगाव नाल्याच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या प्रवाहाच्या उत्तर बाजूस लगत नदीपात्रात भर टाकण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा : श्रीगोंदा पोलीस स्टेशनची विना नंबर प्लेट दुचाकींवर धडक कारवाई; लाखाचा दंड वसूल

भूमी अभिलेख कार्यालयास निर्देश (Protest)

संबंधित पुलाच्या बांधकामामुळे सीना नदीचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा झाला आहे. मुसळधार पाऊस झाल्यास हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. पावसाळा सुरू झाल्याने कधीही नदीला पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण व अनधिकृत पुल हटवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अभिजीत वांढेकर यांनी संबंधित गटाची मोजणी करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास निर्देश दिले आहेत.