
Cooperative Sugar Factory Election : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या ‘ज्ञानेश्वर’, ‘मुळा’ व ‘वृध्देश्वर’ या साखर कारखाना निवडणुकीत अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ठ झाले आहे. अर्ज माघारीनंतर भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकार साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांना यश आले. मात्र, सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तीन जागांसाठी तर आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदाही कारखाना निवडणूक (Cooperative Sugar Factory Election) बिनविरोध करणे घुले बंधूंना जमले. मात्र, माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) व आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांचे प्रयत्न अपुरे पडले. थोड्या जागांसाठी यांचे घोडे अडले.
ज्ञानेश्वर साखर कारखाना निवडणूक बिनविरोध
माजी आमदार नरेंद्र घुले आणि चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या सर्व २१ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. या बिनविरोध निवडीमुळे घुले बंधूंचे सहकार क्षेत्रातील नेतृत्व आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कारखान्याच्या विकासासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या एकजुटीचे हे प्रतीक मानले जात आहे. निवडणुकीत शेवगाव, शहरटाकळी, कुकाणा, नेवासा, वडाळा आणि ढोरजळगाव गटांसह महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, नामाप्रवर्ग तसेच उत्पादक व बिगर उत्पादक संस्थांच्या मतदारसंघातील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मुळा कारखाना निवडणुकीत गडाखांचे निर्विवाद वर्चस्व (Cooperative Sugar Factory Election)
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत १८ जागा बिनविरोध निवडून आणल्या. मात्र, कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात मात्र त्यांना अपयश आले. आता करजगाव गटातील दोन जागा आणि महिला प्रतिनिधीची एक जागा यासाठीच निवडणूक होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर गडाख विरोधी गटाकडून सर्व जागांवर लढत दिली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात विरोधकांना सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने विरोधी पॅनलवर केवळ तीन जागांसाठी निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढवली आहे.
निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी खंडीत
आदिनाथनगर येथील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या १९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदारसंघातून कासार पिंपळगाव गटातील दोन जागेसाठी तीन अर्ज राहिल्याने येथे मतदान होणार आहे. कासार पिंपळगाव गट वगळता इतर मतदारसंघातील १७ जागा बिनविरोध निवडून आणण्यात सत्ताधारी आमदार मोनिका राजळे यांच्या गटाला यश आले. मात्र, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी खंडीत झाली आहे.
सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी मतदारसंघातून कासार पिंपळगाव गटातील दोन जागेसाठी सत्ताधारी गटातून आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धव रघुनाथ वाघ व विरोधी गटाचे शिवशंकर अर्जुन राजळे यांचे अर्ज राहील्याने येथे मतदान होणार आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी गटाकडून मोठे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना यश आले नाही. एकंदरीत कारखाना निवडणूक बिनविरोध करणे घुले बंधुना जमले ते गडाख व राजळे यांना जमू शकले नाही. याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत दिसून येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..


