Yoga Day : नगर : प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना योगामुळे केवळ शरीर निरोगी राहत नाही, तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळे प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले.
योग दिन उत्साहात
शहरातील जॉगिंग ट्रॅक येथे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसेच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा भारतीचे चंद्रशेखर कुलकर्णी, अभय महाजन, डॉ. साताळकर, डॉ. हर्षवर्धन तन्वर, गिरीश कुलकर्णी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते निर्मल थोरात, सुनील जाधव, मनीषा पुंडे, कोमल वाकळे, शैलेश गवळी, संजय साठे, मनीष राठोड आदी उपस्थित होते.
नक्की पहा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृता फडणवीस यांची योगसाधना…
योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली (Yoga Day)
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. योगामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते. जिल्हावासीयांनी नियमित योग करून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.



