Football Fever 2026 : संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीच्या फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदानावर रिमझिम पावसात भिजत आनंद घेत उपस्थित हजारो संगमनेरकरांनी फुटबॉल फिव्हर २०२६ (Football Fever 2026) चा मनसोक्त आनंद घेतला. याचबरोबर या खेळाचे जगभरात सर्वाधिक जास्त चाहते असून संगमनेर मधील नागरिकांनी या खेळाचा आनंद घ्यावा व खेळातून अनेक गुणवंत खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा काँग्रेस (Congress) पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.
नक्की वाचा : अण्णा हजारे यांचे 5 जुलैपासून राळेगणसिद्धीत उपोषण; माहितीचा अधिकार कायद्यातील दुरूस्तीला विरोध

थोरात व तांबे यांच्या हस्ते फुटबॉल मैदानाचे उद्घाटन
वेल्हाळे परिसरात अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय साईजचे अद्यावत लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रिमझिम पावसात संगमनेर फुटबॉल क्लब व एवरेस्ट फुटबॉल क्लब यांच्यामध्ये प्रदर्शनीय सामना झाला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय साईज असलेले फुटबॉल क्रीडांगण बनवण्यात आले आहे. डोंगराच्या कुशीत नैसर्गिक पायर्यांवर अत्यंत सुंदर असणाऱ्या या क्रीडा मैदानाचे उद्घाटन यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बाळासाहेब थोरात म्हणाले की (Football Fever 2026)
याप्रसंगी संगमनेर हौशी फुटबॉल प्रेमी, एवरेस्ट फुटबॉल क्लब, ध्रुव ग्लोबल अकॅडमी, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल, डेंटल कॉलेज यांसह विविध फुटबॉल संघाचे अत्यंत थरारक सामने झाले.यावेळी शुभेच्छा देताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या जगामध्ये फिफा वर्ल्ड कप सुरू असून संपूर्ण जगामध्ये याचा फीवर आहे. फुटबॉल हा सर्वात वेगवान खेळ असून जगातील सर्वात जास्त देशांमध्ये खेळला जातो. या खेळाची लोकप्रियता मोठी आहे. अत्यंत लहान देशही हा खेळ खेळत असून संकटातील देश सुद्धा या खेळात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. सध्या फिफाच्या वर्ल्डकप मुळे जगाला या खेळाची मोठ्या आनंदाची पर्वणी सुरू आहे.
पारंपारिक नृत्य सादर
कॅनडा,अमेरिका, युरोप, फ्रान्स यांसह अनेक देशांमध्ये हा खेळ खेळला जात असून त्यांचा उद्घाटन सोहळा हा खूप दिमाखदार व आपल्या कित्येक पटीने पुढे आहे. या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतीयांचा सहभाग असून केले आहे. जगाबरोबर संगमनेर मध्येही या खेळाची आवड निर्माण व्हावी याकरता आंतरराष्ट्रीय साईजचे मैदान बनवण्यात आले असून भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान बनवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. याचबरोबर शेजारी क्रिकेटचे भव्य मैदानही केले जाणार आहे.
खेळामधूनही अनेक करिअरच्या संधी
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा आपल्या शेतकरी कुटुंबातील असून त्याला संधी मिळाली त्यांनी शिक्षण घेतले कष्ट केले आणि जागतिक पातळीवर आपले नाव केले. खेळामधूनही अनेक करिअरच्या संधी असून युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर पाणी हे जीवन आहे. पाऊस येणे अत्यंत गरजेचे आहे अशी प्रार्थना करताना पाण्याचा जपून वापर करा खेळाचा आनंद घ्या कारण जीवनामध्ये पाणी आणि आरोग्य याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे ते म्हणाले. याचबरोबर येणाऱ्या काळात युवकांनी रील न पाहता युट्युब वर फुटबॉलचे उद्घाटन कार्यक्रम व सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.
निरोगी जीवनासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर मध्ये युवकांना आंतरराष्ट्रीय साईझचे फुटबॉल स्टेडियम उपलब्ध झाले आहे. यामधून अनेकांना फुटबॉलचा आनंद घेता येणार आहे. खेळ हा मनाला व जीवनाला आनंद देणारा असून निरोगी जीवनासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. मैथिली तांबे, शरयू देशमुख, पांडुरंग घुले यांनीही उपस्थित त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कृषी महाविद्यालयाच्या इमारतीवर ४० फूट स्क्रीन लावण्यात आली होती या स्क्रीनवर फिफा वर्ल्ड कपचे महत्वाचे क्षणचित्रे व गोल आणि सामन्यांचे थरार अनुभवण्याची संधी उपस्थित त्यांना मिळाली. कार्यक्रमानंतर खेळातील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात आले.



