
Court Decision : नगर : अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात २०२१ मध्ये उघडकीस आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या बेकायदेशीर बायोडिझेल प्रकरणात अडकलेले व्यावसायिक अशोक हरिभाऊ कोतकर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा निर्णय रद्दबातल ठरवत, न्यायालयाने या गुन्ह्यातून अशोक कोतकर यांचे नाव पूर्णपणे वगळण्याचे (डिस्चार्ज) आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोतकर यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात २६ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सन २०२१ मध्ये अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केडगाव परिसरात बेकायदेशीररीत्या बायोडिझेलसदृश इंधनाची विक्री करून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला होता. या संपूर्ण रॅकेटमध्ये व्यावसायिक अशोक कोतकर यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्यांना या प्रकरणात आरोपी केले होते. या कारवाईमुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
नक्की पहा : आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा डंका थेट देशाची राजधानी दिल्लीत वाजला
न्यायालयात नेमका काय युक्तिवाद झाला? (Court Decision)
कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी कोतकर यांच्या विरोधात निर्णय दिला होता, त्याविरोधात त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी कोतकर यांच्या वतीने प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. सचिन पाठक यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, पोलिसांचा तपास अहवाल आणि सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने ॲड. सचिन पाठक यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. याच निरीक्षणाआधारे न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आधीचा आदेश बाजूला सारत, या गाजलेल्या बायोडिझेल गुन्ह्यातून अशोक कोतकर यांचे नाव तात्काळ वगळण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे सुरुवातीपासून निर्दोषत्वाचा दावा करणाऱ्या कोतकर यांना अखेर न्यायालयातून न्याय मिळाला आहे.


