Nilesh Lanke : सरसकट कर्जमाफीसाठी पारनेरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा; खासदार निलेश लंके आक्रमक

0
Nilesh Lanke : सरसकट कर्जमाफीसाठी पारनेरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा; खासदार निलेश लंके आक्रमक
Nilesh Lanke : सरसकट कर्जमाफीसाठी पारनेरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा; खासदार निलेश लंके आक्रमक

Nilesh Lanke : नगर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, तसेच बियाणे, खते, औषधे आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी पारनेर येथे मंगळवारी (ता. २३) खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ट्रॅक्टर, बैलगाडीसह शेळ्या, मेंढ्या, शेतकरी सहभागी झाले होते. खासदार लंके यांच्यासह सहभागी पदाधिकाऱ्यांनी गळ्यात घातलेल्या कांद्याच्या माळा मोर्चात आकर्षण ठरल्या.

हेही वाचा :  तांबेवाडी येथे भिंत फोडून घरफोडी; एक लाख ९३ हजारांचा ऐवज लंपास

प्रमुख मागण्या

या मोर्चात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक अटी-शर्ती लावण्यात आल्याने मोठा वर्ग लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच पीकविमा योजनेतील जाचक अटी आणि ट्रिगर पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणे एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. शेतकरी हिताच्या विविध मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

नक्की पहा : अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीसाठी आमदार राजळे यांची धाव; स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात केले दाखल

दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर आंदोलन (Nilesh Lanke)

मोर्चादरम्यान कांद्यासह अन्य शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेसह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खासदार लंके यांनी दिला.