Yoga | नगर : योग (Yoga) ही भारताची प्राचीन आणि अमूल्य आरोग्य परंपरा असून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णमाला बांगर यांनी केले.
जिल्हा आयुष रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आयुष रुग्णालयात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्शना धोंडे-बारवकर, योगविद्याधामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा, योगविद्याधामचे उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे वाचा – ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला तत्काळ शैक्षणिक सवलती द्या : राधाकृष्ण विखे
योग हे भारताचे वैभव (Yoga)
डॉ. बांगर म्हणाल्या की, योग हे भारताचे वैभव असून आज संपूर्ण जग आरोग्य संवर्धनासाठी योगशास्त्राचा स्वीकार करीत आहे. वाढत्या हृदयविकार, मधुमेह, सांधे व मणक्यांच्या विकारांपासून बचाव करण्यासाठी नियमित योगाभ्यास, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

डॉ. दर्शना धोंडे-बारवकर म्हणाल्या की, नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी आणि संतुलित राहते. व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेत वाढ होऊन मानसिक तणाव कमी होतो. योगविद्याधामचे संस्थापक सदस्य दत्ता दिकोंडा यांनी नियमित योगाभ्यासाचे विविध आरोग्यदायी लाभ स्पष्ट केले. सांधे, मणके, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवर योग, प्राणायाम आणि ध्यान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की वाचा : श्रीगोंदा नगरपालिकेतील मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांचा एल्गार
योग प्रशिक्षण (Yoga)
परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली कोरडे यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित केले. योग प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिका रुग्णांना उपचारास पूरक ठरणाऱ्या प्राणायाम, ध्यान आणि योगासनांचे मार्गदर्शन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी परिचर्या विद्यार्थीनी वैष्णवी पवार यांनी नियमित योगाभ्यासामुळे झालेल्या आरोग्य लाभांचे अनुभव कथन केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
योगविद्याधाम संस्थेच्या योगतज्ज्ञ अंजली कुलकर्णी आणि अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी सूक्ष्म व्यायाम, विविध योगासने, प्राणायाम, ध्यान, ओंकार साधना तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शौनक मिरीकर यांनी केले तर डॉ. अर्चना लांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. शोभा धुमाळ, डॉ. कीर्ती शेळके, डॉ. इरशाद मोमीन, डॉ. नाझिया शेख, संगीता नन्नवरे, अजिंक्य पवार, वर्षा जाधव, विशाल केदारी, अश्विनी बोरगे, योगिता कदम, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, पवन शिसोदे, एलिझाबेथ तेलधुणे, अश्विनी निमसे, चैतन्य निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले.



