Unseasonal Rain : नगर : एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व वादळी वाऱ्यामुळे (Stormy Winds) बाधित झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी २१ कोटी ३० लाख ३७ हजार ४०० रुपयांच्या अनुदानास शासनाने मंजुरी दिली असून, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते (Resident Deputy Collector Dadasaheb Gite) यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
१२ हजार ३४६.३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सादर केलेल्या अंतिम सुधारित अहवालानुसार जिल्ह्यातील १९९ गावांतील २१ हजार ४९५ शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले असून, १२ हजार ३४६.३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार नेवासा तालुक्यात सर्वाधिक १० हजार २९४ शेतकरी व ६ हजार ३३५.७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याखालोखाल राहुरी, पारनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ही मदत शासनाच्या २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांसाठी मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १७ हजार रुपये व फळबाग क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपये या दराने अनुदान देण्यात येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकदाच मदत देण्यात येईल याची दक्षता घेण्याचे निर्देश (Unseasonal Rain)
चालू हंगामात यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या मंजूर निधीचा समावेश नसल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एका हंगामात विहित दराने केवळ एकदाच मदत देण्यात येईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार असून, कोणत्याही लाभार्थ्यास दुबार मदत मिळणार नाही याची तहसील कार्यालयांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मंजूर निधीचा वापर केवळ मंजूर उद्देशासाठीच करण्यात यावा. निधी खर्च करताना शासन निर्णयातील सर्व सूचना, निकष, अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे. नैसर्गिक आपत्तीबाबत विहित अटींची पूर्तता झाल्यानंतरच मदतीचे वितरण करण्यात यावे, अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.



