
Nasrapur Case : नगर : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथे विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी भीमराव कांबळे याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्यावर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने स्वतंत्र युक्तिवाद करण्यात आला. आज, सोमवारी दिल्या जाणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी पीडित चिमुरडीचे आई-वडील, आजी आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.
हेही वाचा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ
न्यायमूर्ती काय म्हणाले?
निकालवाचन करताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके म्हणाले की “सरकारी वकिलांनी युक्तिवादात १२ केसेसचा उल्लेख केला. त्यापैकी अनेक घटनांमध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे सर्व निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य दाखवतात. काही निकालांमध्ये सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, मात्र ती हायकोर्टाने रद्द ठरवली. मात्र सत्र न्यायालयाचे निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याचीही उदाहरणं आहेत. क्रूरता, समाजावरील परिणाम या गोष्टींची फाशी कायम ठेवताना विचार केला जातो. पीडिता स्वसंरक्षण करण्याच्या स्थितीत होती का, हेही पाहिलं जातं. दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण ठरु शकते का?” याचाही विचार सर्वोच्च न्यायालय करत असल्याचं न्यायमूर्ती म्हणाले.
नक्की पहा : पाईपलाईन दुरुस्तीसाठी डीएसपी चौकात रस्त्याचे खोदकाम; महामार्गावर एकेरी वाहतूक
दुर्मिळात दुर्मिळ केस (Nasrapur Case)
घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसोबत का होता, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. या प्रकरणातील सर्व बिंदू जोडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. कट रचून शांत डोक्याने केलेली हत्या गुन्ह्याचं गांभीर्य दर्शवते. कट रचून बलात्कार आणि हत्या या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. समाजावर घटनेचे दूरगामी परिणाम घडणार असतील, तरीही फाशीची शिक्षा दिली जाते.” याकडेही अंतिम निकाल वाचनात न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं.


