Crime : अकोले : शहरासह ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकार्यांनी सराईत आठ गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी उपविभागातील गुन्हेगारांविरुद्ध पाठविलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी अहिल्यानगर जिल्हा, तसेच शेजारील जिल्ह्यांच्या सीमांमधून 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : ८०० सहायक करणार यंदा ई-पीक पाहणी; सातबारा उताऱ्यावरील नोंदी होणार सुलभ
तडीपारीचे आदेश
संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि अकोलेचे मोहन बोरसे यांना आपापल्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षकांनी हे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे सादर केले. या प्रस्तावांची कसून चौकशी केल्यानंतर ते मंजुरीसाठी प्रांताधिकार्यांकडे कारवाईसाठी पाठवण्यात आले होते, प्रांताधिकारी उंडे यांनी अंतिम शिक्कामोर्तब करून हे तडीपारीचे आदेश पारित केले.
नक्की पहा : महापौर ज्योती गाडे यांनी जॉगिंग ट्रॅकच्या संरक्षण भिंतीची केली पाहणी
‘यांना’ केले तडीपार…(Crime)
या कारवाईत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र तुकाराम सानप (रा. सोनोशी) याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकेत पांडुरंग खरात, सागर विजय खरात, अनिल निवृत्ती खरात आणि दत्तात्रय निवृत्ती खरात (चौघेही रा. कोतूळ) यांना प्रत्येकी 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तर बाळू किसन चौधरी (रा. धामणगाव पाट) यालाही 6 महिन्यांसाठी जिल्ह्याबाहेर काढले आहे. तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजिक रज्जाक शेख (रा. मदिनानगर) याला 1 वर्षासाठी, तर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश बबन कुरकुटे (रा. कुरकुटवाडी) याला 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या सर्व गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आदेशानुसार या सर्वांना अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका या भागात प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.



