Bird Rescue : नगर : सावेडी उपनगरातील अय्यप्पा मंदिर परिसरात ‘चिनी मांजामध्ये’ पाय अडकल्याने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या कावळ्याच्या पिल्लाला जीवदान देण्यात आले. पर्यावरणप्रेमी अमित गायकवाड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अतिशय धाडसीपणे या पिल्लाची सुखरूप सुटका केली. राजेश देशपांडे यांच्या जागरूकतेमुळे ही घटना उजेडात आली.
हेही वाचा : शिर्डीच राजकारण अन् उद्धव ठाकरेंना गुगली, वाचा सविस्तर…
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी की, अय्यप्पा मंदिराजवळील लिंबाच्या झाडावर लटकलेल्या कावळ्याचा फोटो राजेश देशपांडे यांनी प्रसिद्ध छायाचित्रकार संजय दळवी यांना पाठवून कावळ्याला वाचवण्यासाठी मदत मागितली. यावर दळवी यांनी तात्काळ अमित गायकवाड यांना संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. फोनवरून माहिती मिळताच ते दोघे घटनास्थळी पोहोचले. त्यांना कावळ्याचे पिल्लू सुमारे ३५-४० फूट उंचीवर झाडाच्या शेंड्यावर अडकलेले दिसले. अमित गायकवाड यांनी तात्काळ झाडावर चढून सोबत आणलेल्या स्टिक आणि छोट्या करवतीने मांजा कापण्याचे काम सुरू केले.
नक्की पहा : भारतात 40-42 अंश पचवणारे आपण, मग युरोपमध्ये 40 अंशांचा हाहाकार का?
शिताफीने सुटका (Bird Rescue)
राजेश देशपांडे, त्यांच्या पत्नी स्वाती देशपांडे आणि शेजारील मित्रांनीही तात्काळ मदत केली. खाली ब्लँकेट धरून तयारी ठेवली होती. पिल्लाच्या पायाला मांजा करकचून आवळला गेल्याने आणखी काही तास उशीर झाला असता पायाचे दोन तुकडे झाले असते. अमित गायकवाड यांनी शिताफीने मांजा कापला. पण या दरम्यानती फांदी तुटली आणि पुन्हा ती मध्येच अडकली. तेथूनही त्याची सुटका करताना पुन्हा खूप कसरत करावी लागली आणि तो कावळा त्या फांदीसह उडाला. अखेर त्याला पकडून कात्रीने उरलेला मांजा कापण्यात आला. जखमेवर डेटॉल स्प्रे, हळद लावली आणि इलेक्टरल पावडरचे पाणी पाजले. पिल्लू हळूहळू शांत झाले. या थरारक सुटकेनंतर सर्वांनी अमित गायकवाड यांचे आभार मानले.



