Shirdi News : शिर्डीच राजकारण अन् उद्धव ठाकरेंना गुगली,वाचा सविस्तर…

0
Shirdi News : शिर्डीच राजकारण अन् उद्धव ठाकरेंना गुगली,वाचा सविस्तर...
Shirdi News : शिर्डीच राजकारण अन् उद्धव ठाकरेंना गुगली,वाचा सविस्तर...

नगर : शिर्डी (Shirdi News) लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नेहमीच गुगली टाकणारे ठरले आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Shirdi MP Bhausaheb Vakchoure) अचानक शिंदे गटात गेले. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत सभा आयोजित करताच सभेच्या पूर्वसंध्येला चक्क त्यांच्या पक्षातील जिल्हा प्रमुखांसह १० पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरेंसाठी एवढी डोकेदुखी का ठरतोय चला जाणून घेऊ…

नक्की वाचा : ‘पीओपी’च्या गणेशमूर्तीचा वाद यंदा पुन्हा रंगणार;कारण काय?

विखे आणि वाकचौरे कनेक्शन काय?  (Shirdi News)

उद्धव ठाकरे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून शिवसेनेतील पक्षीय राजकारणात मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. त्याच वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव झाला. युतीच्या जागा वाटपात ही जागा नेमकी शिवसेनेच्या वाट्याला आली. निवृत्त सनदी अधिकारी असलेले भाऊसाहेब वाकचौरे हे विखेंचे निकटवर्तीय समजले जातात. मतदारसंघाचे आरक्षण जाहीर होताच वाकचौरे काँग्रेसच्या सभांमध्ये दिसू लागले.

मात्र, आघाडीच्या जागा वाटपात ही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाला जाहीर झाली आणि वाकचौरे अचानक निष्ठावंत शिवसैनिक झाले. यातच ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकीय संघर्षामुळे बाळासाहेब विखे पाटलांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे विखे नाराज झाले होते. या नाराजीचा फायदा व शिवसैनिकांच्या ताकदीच्या बळावर वाकचौरे खासदार झाले,असे बोलले जाते.

अवश्य वाचा : अखेर भीमराव कांबळेला फाशी; नरसापूर प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचे हे यश अधिक काळ टिकू शकले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाकरेंकडून वाकचौरेंना उमेदवारी मिळणार हे निश्चित असतानाच ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाऊसाहेब वाकचौरेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत विखेंच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. निवडणुकीत शिवसेनेला उमेदवार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळी मतदानाला अवघे १७ दिवस बाकी असताना भाजपचे कर्जत-जामखेडमध्ये आमदारकीची हॅटट्रीक केलेल्या सदाशिव लोखंडेंना उमेदवारी देण्यात आली.

उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रचाराचा धुरळा उडवला. वाकचौरेंना गद्दार म्हणत ठाकरेंनी तुफान भाषणे केली. मोदी लाट व युतीतील पक्ष संघटनेच्या बळावर वाकचौरेंना पराभूत करत लोखंडे खासदार झाले. शिवसेना व भाजपची युती टिकून असे पर्यंत लोखंडे त्याच मतदारसंघात खासदार होते. मात्र, शिवसेनेत दोन गट पडताच भाजपला जवळ असलेल्या शिंदे गटात जाण्यात लोखंडे यांनी धन्यता मानली आणि पुन्हा उद्धव ठाकरेंना शिर्डीत सभा घ्याव्या लागल्या. 

वाकचौरेंचा शिवसेनेला रामराम  (Shirdi News)

लोखंडेंना ठाकरेंनी गद्दार ठरवत टीकेच्या तोफा डागल्या. मात्र, या लोखंडेंच्या विरोधात त्यांनी भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिली. शिवसैनिक नाराज झाले. मात्र, पक्षाने तिकीट दिल्याने कार्यकर्ते कामाला लागले. एक वेळ गद्दार म्हटलेल्या वाकचौरेंना त्याच शिवसैनिकांनी मते मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस केला. पक्ष संघटनेच्या बळावर वाकचौरे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खासदार झाले. मात्र, अवघ्या दोनच वर्षात त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला.

शिवसैनिकांची ससेहोलपट अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाऊसाहेब वाकचौरेंच्या विरोधात शिर्डीमध्ये सभा घेत वाकचौरेंना गद्दार म्हटले. मात्र, या सभेपूर्वीच ठाकरेंना मोठा धक्का बसला.या भागातील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांसह तब्बल १० पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ठाकरेंना नगरी ग्रामीण राजकारण एवढे चकवे का देत आहे,यावर आता चर्चा होत आहे.