
Power Substation to be Locked Up : नगर : सावेडी उपनगरातील सावेडी, बालिकाश्रम रोड, सुडके मळा, बोरुडे मळा, धर्माधिकारी मळा, भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा आणि शिंदे मळा या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा अक्षरशः लपंडाव सुरू असून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कमी-जास्त होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, पाण्याच्या मोटारी तसेच इतर महागडी विद्युत उपकरणे जळत असून नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कमी-जास्त व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान
वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचा अभ्यास, नोकरदारांचे ऑनलाइन काम तसेच व्यावसायिकांचे व्यवहार यावरही याचा विपरीत परिणाम होत असून नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तर सावेडी वीज उपकेंद्राला टाळे (Power Substation to be Locked Up)
या गंभीर प्रश्नाची दखल घेत माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे आणि पुष्कर कुलकर्णी यांनी महावितरण प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, येत्या आठ दिवसांत सावेडी उपनगरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, वारंवार होणारे ट्रिपिंग आणि कमी-जास्त व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला गेला नाही, तर सावेडी येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राला टाळे ठोकून (Power Substation to be Locked Up) तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
त्यांनी पुढे सांगितले की, महावितरणने नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे ही त्यांची मूलभूत जबाबदारी आहे. वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे नागरिकांच्या घरातील लाखो रुपयांची विद्युत उपकरणे खराब होत आहेत. या नुकसानीची जबाबदारी महावितरण प्रशासनाने स्वीकारून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.
सावेडी उपनगरातील नागरिकांनीही वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


