नगर : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे शिलेदार म्हणून सध्या राज्यभर ओळखले जातात. मात्र, ते शरद पवारांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार (Will join the Shinde faction) असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ…
नक्की वाचा : अतिउत्साही गोरक्षकांचा शेतकऱ्याला फटका;श्रीरामपूर मध्ये नेमकं काय घडलं?
निलेश लंके यांची राजकीय कारकीर्द? (Nilesh Lanke)
अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार व विखे गट यांच्यातील राजकीय संघर्षात निलेश लंके हे पवारांचे महत्त्वपूर्ण राजकीय मोहरे आहेत. या मोहऱ्याच्या बळावरच लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी डॉ. सुजय विखे पाटलांना पराभवाचा धक्का दिला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात विखे व थोरात असे दोन राजकीय गट आहेत. यात विखे गटाला शह देण्यासाठी पवार नेहमीच थोरात गटाला जवळ करत आल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मागील आठ वर्षांत पवारांनी विखेंना शह देण्यासाठी मास्क लिडर म्हणून ओळख असलेल्या लंकेंना राजकीय ताकद देत खासदार केले. लंके हे आधी आमदार, पुढे खासदार होईपर्यंतची त्यांची राजकीय कारकिर्द त्यांच्या यशाचं रहस्य ठरली. हे राजकीय रहस्यच त्यांचे पक्षांतर घडवेल अशी चर्चा रंगू लागली आहे.
अवश्य वाचा : पक्षांतरबंदी कायदा पुन्हा चर्चेत; कायदा नेमका काय?
पारनेरमध्ये शिवसैनिक तयार करण्यात लंकेची महत्त्वाची भूमिका (Nilesh Lanke)
सुरुवातीला निलेश लंके हे अहिल्यानगर शहरातील कायनेटिक कंपनीत कामगार होते. तेथेच ते शिवसेनेच्या कामगार सेनेच्या संपर्कात आले. माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांच्यासोबत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांच्या हंगा गावात शिवसेनेची शाखा सुरू केली. पारनेर तालुक्यात तरुण शिवसैनिक तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या लंके यांनी तत्कालीन अभ्यासू आमदार विजयराव औटींविरोधात बंड केले. उद्धव ठाकरेंनी विजयराव औटींची बाजू घेतली. त्यामुळे नाराज झालेल्या लंकेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले. मात्र, त्यांचा संपर्क शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांशी कायम राहिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी लंकेंना राष्ट्रवादीत घेत आमदारकीचे तिकीट दिले आणि आमदारकीच्या पहिल्याच निवडणुकीत लंकेंनी विजयराव औटींना पराभूत केले.राष्ट्रवादीत आलेल्या लंके यांनी शरद पवारांचा विश्वास संपादित केला. पुढे पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखेंच्या विरोधात त्यांना राजकीय बळ देत खासदार केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. अजित पवार यांचे निधन व शरद पवारांचे तनपुरेंसारखे एक-एक करत साथीदार दूर होत चालल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेतील जुना संपर्क लंकेंच्या कामी येऊ शकतो व ते शिवसेनेच्या शिंदे गटात जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना खासदारकीचा बळी द्यावा लागणार आहे.
एकनाथ शिंदे व निलेश लंके यांचा संपर्क असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेत मान्यही केले होते. त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले आहे. मागील महिन्यात शरद पवार विखे पाटलांचे गाव असलेल्या लोणीतील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या वाहनातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व खासदार लंके यांनी प्रवास केला होता. त्यावेळी लंके व पवार यांच्यात काही चर्चा झाली का? यावरही उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. ही राजकीय चर्चा पुढे चर्चाच राहणार की नवीन राजकीय समीकरणे पहायला मिळणार हेच आता पहावे लागेल.



