Sangram Jagtap : नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका आमदार जगताप

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

0
Sangram Jagtap : नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका आमदार जगताप
Sangram Jagtap : नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका आमदार जगताप

Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) वाढती अस्वच्छता, सर्वत्र साचलेला कचरा, अतिक्रमणांचा विळखा, मोकाट कुत्रे व जनावरांचा वाढता उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीवर आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) संतप्त होत महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत महापालिकेचे (Municipal Corporation) अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मूतकेकर, संबंधित अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मुंबईसारखी दुर्दैवी घटना नगरमध्ये घडण्याची वाट पाहू नका; नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा द्या, अशा सूचना आमदार जगताप यंनी दिल्या.

नक्की वाचा : रॉड तुटल्याने स्कूल बस पलटी; १५ ते २० विद्यार्थिनी किरकोळ जखमी

कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

शहरात स्वच्छता व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्यावरही आ.जगताप यांनी नाराजी व्यक्त करत कर्तव्यात कसूर करणाऱ्या, उद्धटपणे वागणाऱ्या, बेशिस्त आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अशा कर्मचाऱ्यांना एक महिन्याची बिनपगारी सुटी देण्याबरोबरच त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मूतकेकर यांना दिले. यापुढे शहरातील स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन आणि मोकाट कुत्रे जनावरांचा प्रश्न प्राधान्याने सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती प्रमाणे काम करावे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल, असा इशाराही आमदार जगताप यांनी दिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अतिरिक्त उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन (Sangram Jagtap)

नगर शहरात पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिकांचे चावे घेत जखमी केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेवर मोर्चाने जात अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मूतकेकर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यानंतर आमदार संग्राम जगतापही तिथे येत आक्रमक भूमिका घेत तातडीने सर्व प्रमुख अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांची बैठक बोलावण्याचे आदेश त्यांनी दिले. या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे नगरसेवकांनी उपायुक्तांसह, अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरीक्षक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारला. शहरातील सत्ताधारी नगरसेवकांचे कामे होत नाहीयेत, मनपाचे अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत कामचुकारपणा करत आहेत, एक काम दहा वेळा सांगूनही होत नसल्याची नाराजी यावेळी आ.जगताप यांच्यासह सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली.

संग्राम जगताप म्हणाले की

शहरात निर्माण झालेल्या बिकट परीस्थितीमुळे संतप्त झालेले आमदार संग्राम जगताप म्हणाले, महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी व स्वच्छता निरिक्षक कर्मचाऱ्यांनी उद्यापासून रोज सकाळी ६ वाजता नेमून दिलेल्या भागात जाऊन नागरिकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते पूर्ण करावेत. त्या भागात डीप क्लीन सह रस्त्यावरील अतिक्रमणे, दुकानांचे बोर्ड, मातीचे ढिगारे त्वरित काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा. रस्त्यावरील चेंबरचा व गटेरींचा सर्वे करून त्यावर झाकणे बसवा. झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापून तसेच रस्त्यावर आलेल्या झाडांची छाटणी करा, पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांवर कारवाई करून त्यांना पकडा. यासाठी मंजुरीची वाट न पाहता आपत्कालीन परिस्थितीप्रमाणे त्वरित कारवाई करा. केलेल्या कामाचे फोटो काढून वरिष्ठांना व प्रभागाच्या नगरसेवकांना पाठवावीत, असे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी दिले.

सर्व कर्मचाऱ्यांनी रोज गणवेश घालूनच काम करावे

ते म्हणाले, ज्या संस्थेचे मीठ खातो त्याप्रती निष्ठा बाळगून दिलेल्या कामाचे कर्तव्य प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडणे आवश्यक असताना नगरमध्ये विरुद्ध परिस्थिती आहे. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर तसेच अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी रोज गणवेश घालूनच काम केले पाहिजे, असे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिले.
यावेळी महापौर ज्योती गाडे यांनी आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे व आदेशांचे तंतोतंत पालन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करून नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी निष्ठेने काम करण्याचे आदेश दिले.

यांची उपस्थिती

या बैठकीत उपमहापौर धनंजय जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगरसेवक निखिल वारे, प्रकाश भागानगरे, अनिल बोरुडे, कुमार वाकळे, बाबासाहेब वाकळे, अनिल ढवण, महेश लोंढे, मयूर बांगरे, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार आदींनी वेगवेगळे विषय व समस्या मांडून परिस्थितीची माहिती दिली. महानगरपालिकेचे उपायुक्त मेहेर लहारे, शहाजान तडवी, अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी सतीश राजुरकर तसेच सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.