
नगर : जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा यावर्षी प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक बातमी आहे. देशभरातील तब्बल ५८ इंजिनिअरिंग (Engineering Colleges Closed) आणि तंत्रशिक्षण महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाविद्यालय बंद होण्याच्या या यादीत महाराष्ट्र (Maharashtra) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) दोघेही अव्वल स्थानी आहेत. मात्र इथे आधीपासूनच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची मुभा दिली जाणार आहे. मात्र ही महाविद्यालये बंद करण्याची वेळ का आली ते पाहू…
नक्की वाचा : फिरायला जायचा प्लॅन करताय! अहिल्यानगर शहराच्या जवळच आहेत ‘ही’ ५ ठिकाणे
सरकारी आकडेवारीनुसार, महाविद्यालये बंद पडण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्ये आघाडीवर आहेत. या दोन राज्यांत सर्वाधिक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. दोन्ही राज्यात १२—१२ कॉलेज बंद पडली आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. येथील ८ महाविद्यालये बंद पडली आहेत. तर पंजाब आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी ४ महाविद्यालये बंद झाली. यासह राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी तीन, तसेच गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन संस्था बंद करण्यात आल्या आहेत. हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि ओडिशामध्येही प्रत्येकी एक महाविद्यालय बंद करण्यात आले आहे. बंद पडलेल्या ५८ संस्थांपैकी तीन संस्थांना सरकारी अनुदान मिळत होते, तर उर्वरित सर्व खासगी महाविद्यालये आहेत.
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांना दिलासा; व्यवस्थापनाच्या वादामुळे रखडलेली शिक्षक भरती आता थेट होणार

एआयसीटीई ही देशातील तंत्र शिक्षणासाठीची राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत सर्वोच्च सल्लागार संस्था आणि नियामक मंडळ महणून काम बघते. ही संस्था अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन आणि या क्षेत्रांतील औषधनिर्मिती कार्यक्रमांवर देखरेख ठेवते. तसेच या क्षेत्रांतील गुणवत्तेची हमी, मानकांचे पालन होते किंवा नाही हे सुनिश्चित करण्याचे काम करते.
महाविद्यालये का बंद करावी लागली? (Engineering Colleges Closed)
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, ही महाविद्यालये बंद करण्यामागे अनेक प्रमुख कारणे आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचे प्रमाण कमी असणे हे आहे. तसेच अनेक संस्थांमध्ये पात्र प्राध्यापक नव्हते. अनेक महाविद्यालये नियमांनुसार पायाभूत सुविधा आणि प्रयोगशाळा उभारण्यात अपयशी ठरली होत्या. ज्यामुळे नियामक प्राधिकरणाला हे कठोर पाऊल उचलावे लागले.
कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं काय होणार? (Engineering Colleges Closed)
आता या महाविद्यालयांमध्ये आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होईल ? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.यावर एआयसीटीईने स्पष्ट केले की, ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ योजनेअंतर्गत या संस्था बंद केल्या जात आहेत. याचा अर्थ म्हणजे, ही महाविद्यालये आता प्रथम वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. मात्र, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा अंतिम वर्षात आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा कोणताही परिणाम होणार नाही; ते त्याच महाविद्यालयात आपली पदवी पूर्ण करू शकतील. जर एखादे महाविद्यालय पूर्णपणे बंद झाले, तर तिथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर केले जाते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना महाविद्यालयाचे स्टेटस तपासून घेणे गरजेचे झालं आहे.


