
Cyber Police Station : नगर : पाथर्डी तालुक्यातील औषध कंपनीतील वैद्यकीय प्रतिनिधी असलेल्या तरूणाच्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून सायबर चोरट्यांनी यूपीआय व्यवहारांच्या (UPI Transactions) माध्यमातून तब्बल १० लाख दोन हजार ७७९ रूपये परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधिताने राष्ट्रीय सायबर गुन्हे (National Cyber Crime) हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवून येथील सायबर पोलीस ठाण्यातही (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
यूपीआयव्दारे रक्कम परस्पर वळवल्याचे उघड
फिर्यादी पाथर्डी तालुक्यातील लोहसर, खांडगाव येथे राहतात. ते जनावरांच्या औषधनिर्मिती कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून कार्यरत आहेत. ४ जुलै रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ८.१० या अवघ्या चाळीस मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या तीन बचत खात्यांमधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय यूपीआयव्दारे सलग व्यवहार करून रक्कम परस्पर वळती केल्याचे उघड झाले. फसवणुकीची माहिती मिळताच बांगर यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू (Cyber Police Station)
सायबर पोलिसांकडे सोमवारी (ता.६) दिलेल्या फिर्यादीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून अनेक टप्प्यांत सुमारे ७ लाख ४१ हजार, कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून दोन लाख ५२ हजार, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एक लाख ६ हजार रूपये असे मिळून एकूण १० लाख दोन हजार ७७९ रूपये अज्ञात व्यक्तीने यूपीआय व्यवहारांव्दारे काढून घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. बँक खात्यांची माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे तपास करीत आहेत.


