
Health Camp : नगर : आषाढी वारीतील वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमांतर्गत प्रवरा मेडिकल कॉलेज, लोणीच्या वतीने राजुरी (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे चरणसेवा व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप
पायांना औषधी तेलाने मसाज
श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे काल (ता. ०७) राजुरी येथे आगमन झाले. यावेळी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास केलेल्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी आयुर्वेदिक औषधी तेलाच्या साहाय्याने चरणसेवा करण्यात आली. पायांना औषधी तेलाने मसाज केल्यामुळे दीर्घ पायी प्रवासामुळे आलेला ताण आणि थकवा कमी होण्यास मदत झाली तसेच पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना नवउत्साह मिळाला. चरणसेवेसोबतच वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी
यांचा सहभाग (Health Camp)
आवश्यक औषधांचे मोफत वाटप, प्रथमोपचार सेवा तसेच विविध आरोग्यविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात प्रवरा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. चरणसेवा या सेवाभावी उपक्रमामुळे पुढील प्रवासाला मोठा आधार मिळाल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष तसेच प्रवरा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवरा मेडिकल कॉलेजचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.


