Akole News : आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी

0
Akole News : आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी
Akole News : आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी

नगर : अकोले तालुक्यातील (Akole News) जामगाव येथील आदिवासी शेतकरी भागवत उघडे (Tribal farmer Bhagwat Ughade)यांना पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर तर सोडा साधी बैलजोडी सुद्धा मिळाली नाही. त्यामुळे या कुटुंबीयानीच खांद्यावर जोखड येत भुईमुगाची पेरणी केली. आर्थिक चणचणीतुन उभा राहिलेला हा प्रसंग एका व्यक्तीचा नाही, तर गावकुसाचे वास्तव दर्शवणारा आहे.

नक्की वाचा : वाळकीतील गोशाळेत धक्कादायक घटना ; चारा-पाण्यासाठी दिलेली जनावरे पैसे घेऊन सोडून दिले

नेमकं प्रकरण काय?  (Akole News)

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीची दोन महत्वाची नक्षत्रे जवळपास कोरडी गेली. आर्द्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतक-यांनी पेरणीसाठी धावपळ सुरू केली. मात्र, एकाच वेळी सगळीकडे पेरणी सुरू झाल्याने बैलजोडी आणि ट्रॅक्टरची टंचाई निर्माण झाली. आदिवासी भागातही यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या लक्षणीय घटली असून जामगावमध्ये ही मोजक्याच बैलजोड्या शिल्लक राहिल्या होत्या.

त्यामुळे याच जामगावमधील अडीच एकर जिरायती शेतीवर सहा जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भागवत उघडे यांच्याकडे स्वतःची बैलजोडी किंवा ट्रॅक्टर नसल्याने त्यांना, वेळेत पेरणी करता आली नाही, पेरणी करता आली नाहीतर तर वर्षभराच्या उत्पन्नावर परिणाम होईल, या चिंतेतून त्यांनी मुलगा आणि भावाला पाभर ओढण्यासाठी जुंपल. पेरलेले बियाणे मातीआड करण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि भावजय यांनी कुळव ओढला. कुटुंबातील सर्वांनी श्रमदान करत सुमारे अर्धा एकर क्षेत्रातील भुईमुगाची पेरणी स्वतः पूर्ण केली आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगरमधील १७ वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म;प्रकरण काय?

शेतकऱ्याच्या भाकरीची आशा जिवंत (Akole News)

गेल्या वर्षीही बैलजोडी मिळाली नाही म्हणून काही जमीन पडीक राहिली होती, यंदा पाऊस उशिरा आला आणि सर्वांचीच पेरणीची घाई सुरू झाली. ट्रॅक्टरचा नंबर लागत नव्हता, बैलजोडीही मिळत नव्हती. परिस्थितीमुळे कुटुंबीयांच्या मदतीनेच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. मेहनत खूप करावी लागली मात्र वर्षभराच्या भाकरीची आशा जिवंत राहिल्याचे शेतकरी भागवत उघडे यांनी सांगितले आहे.

जामगावातील भागवत उघडे यांच्या कुटुंबाची ही कथा केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नाही, तर ग्रामीण भागातील हजारो अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जगण्याचे विदारक वास्तव दाखवणारी गोष्ट आहे. शेती करण्यासाठी बैलजोडी नाही, ट्रॅक्टर परवडत नाही आणि वेळ निघून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांना स्वतःलाच पाभर कुळवाला जुंपावे लागते. एकीकडे शेतीचा वाढता खर्च, तर दुसरीकडे साधनांच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून कृषी व्यवस्थेपुढे उभा राहिलेला गंभीर प्रश्न आहे.