School Holiday : नगर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना बुधवार, दि. ८ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
हेही वाचा : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप
ढगफुटीसदृश परिस्थिती
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दि. ८ जुलै रोजी अकोले तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये आधीच अतिवृष्टी झालेली आहे. ही स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना दि. ८ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी
शिक्षकांनी हजर राहावे (School Holiday)
मात्र, सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधीचे कामकाज करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.



